सिवान (बिहार) : बिहारमधील सिवानमध्ये एका मद्यधुंद तरुणाने नागाशी खेळ केला आहे. कोब्रा नागाशी खेळत असताना नागाने त्याचा चावा घेतला. लोकांच्या करमणुकीसाठी हा तरुण कधी विषारी साप तोंडात भरायचा तर कधी खांद्यावर टांगायचा. ज्यांनी त्याला पाहिले तेही त्याच्या या कृत्याने थक्क झाले. तो तरुण एवढा दारूच्या नशेत होता की, त्याने असे काही केले की त्याचा मृत्यू होईल याची त्यालाच कल्पना नव्हती. त्याच्या मृत्यूनंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तरुण दारूच्या नशेत होता : इंद्रजीत असे या तरुणाचे नाव असून तो तितरा हरिजन टोला येथील रहिवासी आहे. लोकांनी सांगितले की, तो दारूच्या नशेत होता आणि त्याच्या घराजवळील विटा काढत होता. दरम्यान, विषारी नाग फणा काढत समोर आला. काही लोकांनी सापावर डिझेल टाकले, त्यामुळे तो काही काळ सुस्त झाला. दरम्यान, तरुणाने त्याला पकडले. त्याने नागालाच नाही तर आपल्या मृत्यूलाही गळ्यात ओढले आहे याची त्याला कल्पना नव्हती.
खेळताना विषारी नाग चावला : तरुणाने आधी साप पकडला, नंतर त्याच्यासोबत लोकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली. त्याच्या मृत्यूपूर्वीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो नागासोबत खेळताना दिसत आहे. हा तरुण जो नाग आपल्या गळ्यात लपेटत आहे तो साधारण नाग नसून इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आहे. हा नाग जगातील विषारी सापांपैकी एक आहे. कदाचित दारूच्या नशेत असल्याने याची त्याला माहिती नसावी.