समस्तीपूर (बिहार) : बिहारमधील पोलिसांचे गैरकृत्य अनेकदा चर्चेत असते. आता पुन्हा एकदा बिहार पोलीस आपली दादागिरी दाखवल्याने चर्चेत आले आहेत. बिहारच्या समस्तीपूरमध्ये हॉक्स टीमच्या एका जवानाने छोट्याशा चुकीसाठी तरुणाला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर त्याला थुंकी चाटायला लावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपी विनय तिवारी यांनी तातडीने कारवाई करत हॉक्स टीमला निलंबित केले आहे.
जवानाच्या अंगावर पडली गुटक्याची थुंकी :ही घटना शहरातील पटेल मैदान गोलंबरजवळ घडली. बसमधून मुझफ्फरपूरला जाणारा तरुण उभ्या बसच्या खाली रिकामी जागा पाहून थुंकला. त्याचवेळी बस चालकाने बस पुढे नेली. त्यामुळे रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या हॉक्स टीमच्या शिपायाच्या अंगावर थुंकी उडाली. यामुळे संतप्त झालेल्या या जवानाने बसच्या मागे धावत जाऊन बस थांबवली आणि तरुणाला खाली उतरवले.
जवानाने तरुणाला बेदम मारहाण केली : त्यानंतर त्या जवानाने तरुणाला बेदम मारहाण केली. त्याने त्याला स्वतःची थुंकी चाटायला लावली. पीडित तरुण मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने सांगितले की, तो स्टेशनवरून आपले वाहन बुक करून मुझफ्फरपूरला परतत होता. त्यादरम्यान ही संपूर्ण घटना घडली.