पाटणा : बिहारमध्ये पुलाचे काम सुरू असतानाच पूल कोसळल्याने घटनेने बिहार सरकारवर देशभरात टीका होत आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे करण्याचे उपमुख्यमंत्री व रस्ते बांधकाम मंत्री तेजस्वी यादव यांनी आदेश दिले आहेत. यासोबत त्यांनी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. बिहार सरकारने विभागीय अधिकाऱ्यांसह अभियंते आणि बांधकाम कंपनीशी संबंधित लोकांनाही बैठीकासाठी पाचारण केले आहे.
पूल कोसळल्यानंतर रविवारी सायंकाळी बिहारचे बांधकाम मंत्री तेजस्वी यादव यांनी रस्ते बांधकाम विभागाचे अपर सचिव प्रत्यय अमृत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तेजस्वी यादव म्हणाले, की हा तोच पूल आहे, जो यापूर्वी कोसळला होता. त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो. त्याबाबत आम्ही सरकारला जाब विचारला होता. आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा आयआयटी रुरकीकडून पूल कोसळल्याची चौकशी करण्यात आली. पुलाचा खांब क्रमांक 5 कोसळल्याचे सांगण्यात आले. कमकुवत पाया असल्याने पूल पाडण्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याची चौकशी होईल. पण तुम्ही समजून घ्या की पूल पाडण्याची जबाबदारी संबंधितावर देण्यात आली आहे. त्यात कोणतेही नुकसान नाही.
भाजपकडून नितीश कुमार व यादव यांच्या राजीनाम्याची मागणी : पूल कोसळण्याच्या घटनेवरून बिहारमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले की, हे बिहार सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. पूल कोसळण्याची दुर्घटना सर्व भ्रष्टाचार आणि कमिशनमुळे होत आहे. या पुलाच्या निकृष्ट बांधकामाबाबत आमदारांनी सभागृहात सातत्याने प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही हा पूल भागलपूर बाजूने तोडण्यात आला. आता खगरिया बाजूने पूल पाडण्यात आला आहे. नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.