गया : बिहारच्या गयामध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे लोकांनी चोरीच्या आरोपाखाली एका तरुणाला तालिबानी शिक्षा दिली. जमावाने आधी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचे कपडे काढले आणि त्याच्या मिशा कापून मुंडन केले. नंतर त्याला हातपंपाला बांधले. दरम्यान, तो तरुण वेदनेने रडत राहिला आणि दयेची याचना करत राहिला, मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
युवकाला चोरी करताना पकडले : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मुरारपूर परिसरातील आहे. हा व्हिडिओ शुक्रवार दुपारचा म्हणजेच ५ ऑगस्टचा आहे. हा तरुण मुरारपूर परिसरातील एका घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. या दरम्यान घरातील लोकांनी त्याला चोरी करताना रंगेहाथ पकडले. यानंतर स्थानिक लोकांनी त्याची झडती घेतली. त्यांनी त्याच्याकडून मोबाईल आणि इतर काही वस्तू जप्त केल्या. यानंतर लोकांनी तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तेथेच बेदम मारहाण केली. यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्याचे कपडे फाडले. लोकांनी त्याचे मुंडन केले, त्याच्या मिशा आणि भुवया कापल्या आणि नंतर त्याला गावातीलच हातपंपाला बांधले.
पोलिसांनी एफआयआर नोंदवला : घटनेची माहिती मिळाल्यानंतर गया पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. एसएसपीच्या सूचनेनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला गेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची पडताळणी आणि तपासासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.