शेतकरी आंदोलनाचा ४१वा दिवस
कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४१ वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.
पंतप्रधान मोदी करणार कोची-बंगळुरू गॅस पाइपलाइनचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोची-बंगळुरू नैसर्गिक गॅस पाइपलाइन देशाला समर्पित करतील. 'एक देश, एक गॅस ग्रीड' साठी ही महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. गेल (इंडिया) लिमिटेडने ४५०किमी लांबीची पाइपलाइन तयार केली आहे.
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट सुनावणी
मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या १२ वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात ३ डिसेंबर २०२०पासून नियमित सुनावणी सुरू आहे. त्याची दुसरी सुनावणी १९ डिसेंबरला विशेष एनआयए न्यायालयात घेण्यात आली होती. मात्र, सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना ४ जानेवरीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही सुनावणी आज होणार आहे.
मुंबईतील नाईट कर्फ्यू हटवणार
मुंबईसह राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेच्या हद्दीत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईमधील नाईट कर्फ्यु हटवण्यात यावा असा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला असून आज हा कर्फ्यू हटवण्याची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबईत आजपासून पाणीकपात
येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंट दुरुस्ती कामामुळे आज ५ जानेवारीला सकाळी १० ते दिनांक ६ जानेवारी पर्यंत सकाळी १० दरम्यान २४ तासांसाठी मुंबईत १५ टक्के पाणीकपात असणार आहे. याबद्दल माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.