नवी दिल्ली : यावर्षी ७७ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रध्वज फडकवतील आणि राष्ट्राला संबोधित करतील. या कार्यक्रमाला (Independence Day 2023) सरकारच्या 'जन भागीदारी' कार्यक्रमांतर्गत सुमारे १८०० विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमासाठी राजधानी दिल्लीतील १२ ठिकाणी सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांना समर्पित सेल्फी पॉइंट्सही उभारण्यात आले आहेत.
शेतकरी, मजूर, शिक्षक, मच्छीमार यांचाही सहभाग राहणार :यंदा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमात अनेक गावांचे सरपंच, किसान उत्पादक संघटना योजनेचे प्रतिनिधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे लाभार्थी, सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचे कामगार, खादी कामगार, प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमार यांचा सहभाग असेल.
- कार्यक्रमात ४०० हून अधिक सरपंच सहभागी होणार आहेत.
- सेंट्रल व्हिस्टा बनवणारे ५० कामगार देखील उपस्थित राहतील.
- प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ७५ जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक पोशाखात समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.
येथे सेल्फी पॉइंट्स बनवले : या कार्यक्रमासाठी दिल्लीत ठिकठिकाणी १२ सेल्फी पॉइंट बनवले गेले आहेत. नॅशनल वॉर मेमोरियल, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्टेशन, राजीव चौक मेट्रो स्टेशन, दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, आयटीओ मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वारा येथे सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांना समर्पित सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत.