नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी आर्थिक सहकार्यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. थिम्पूवर प्रभाव पाडण्याच्या चीनच्या प्रयत्नांबद्दल भारताच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भूतानच्या राजाने सोमवारी भारत भेटीला सुरुवात केली. डोकलाम वादावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी अलीकडील काही प्रतिक्रियांतून चीनशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत होते. मात्र, भूतानने म्हटले आहे की, सीमा वादावर आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी आणि वांगचुक यांच्यातील चर्चेत द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी दिल्ली विमानतळावर भूतानच्या राजाचे स्वागत केले. यावरून भूतानच्या राजाच्या या भेटीला भारताने दिलेले महत्त्व लक्षात येते. जयशंकर यांनी सोमवारी संध्याकाळी भूतानच्या राजाची भेट घेतली आणि सांगितले की, भूतानच्या भविष्यासाठी आणि भारतासोबतची अनोखी भागीदारी मजबूत करण्यासाठी राजाची दृष्टी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. भूतान हा भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे आणि दोन्ही बाजूंमधील संरक्षण आणि सुरक्षा संबंध गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या विस्तारले आहेत.