भोपाळ (मध्यप्रदेश): एखाद्या व्यक्तीची किंवा ठिकाणाची ओळख खूप महत्त्वाची असते, असे म्हणतात. जेव्हा त्याच्यापासून ओळख हिरावून घेतली जाते, तेव्हा त्याच्या अस्तित्वावरही प्रश्न निर्माण होऊ लागतात. असाच काहीसा प्रकार राजधानी भोपाळमध्ये पाहायला मिळाला. जिथे भोपळपासून 13 किलोमीटर अंतरावरील एक जागा गेल्या 308 वर्षांपासून खऱ्या ओळखीच्या प्रतीक्षेत होती. इस्लामनगरला आता खरी ओळख मिळाली असून, ३०८ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. इस्लामनगर आता जगदीशपूर म्हणून ओळखले जाईल. राज्य सरकारने त्याचे नाव बदलून जगदीशपूर केले आहे. त्याची अधिसूचना राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाड्यांचेही नूतनीकरण केले जाणार आहे.
इतिहास काय सांगतो : हलाली नदीच्या काठावर वसलेला इस्लामनगरचा किल्ला अतिशय सुंदर आहे. इस्लामनगर पूर्वी जगदीशपूर म्हणून ओळखले जात होते. मूळतः जगदीशपूर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण स्थानिक गोंड शासक राजा विजयराम यांनी स्थापन केले होते. 18 व्या शतकाच्या सुरुवातीस, भोपाळ संस्थानाचा संस्थापक दोस्त मोहम्मद खान याने जगदीशपूरच्या राजाचा विश्वासघात करून वध करून जगदीशपूर ताब्यात घेतले. त्यानंतर जगदीशपूरचे नाव बदलून इस्लामनगर करण्यात आले. इस्लामनगर ही दोस्त मोहम्मद खानच्या राज्याची मूळ राजधानी होती. इस्लामनगरमधील चमन महल दोस्त मोहम्मद खान याने १७१५ मध्ये बांधला होता. येथील राणीमहालही अतिशय सुंदर आहे. 1723 मध्ये, दोस्त मोहम्मद खानला थोड्या वेढा घातल्यानंतर इस्लामनगर किल्ला निजाम-उल-मुल्कच्या स्वाधीन करावा लागला. शांतता करारानंतर खानला निजामाच्या अधिपत्याखाली किल्लेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. १७२७ मध्ये त्यांनी आपली राजधानी भोपाळला हलवली.