महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भोपाळ गॅस गळती : जगातील सर्वात भीषण औद्योगिक अपघाताला ३९ वर्ष पूर्ण, वाचा त्या रात्री नेमकं काय घडलं? - जगातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात

Bhopal Gas Tragedy : १९८४ मध्ये भारतात गॅस गळतीची भीषण घटना घडली होती. या घटनेला जगातील सर्वात मोठी औद्योगिक आपत्ती मानलं जातं. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेला आज ३९ वर्ष पूर्ण झाली आहेत. २ आणि ३ डिसेंबरच्या मध्यरात्री या गॅस गळतीमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. वाचा त्या रात्रीची वेदनादायक कहाणी...

Bhopal Gas Tragedy
Bhopal Gas Tragedy

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 4:19 PM IST

भोपाळ Bhopal Gas Tragedy : जगातील सर्वात मोठा औद्योगिक अपघात म्हटल्या जाणाऱ्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या जखमा ३९ वर्षांनंतरही भरून निघालेल्या नाहीत. या दुर्घटनेत हजारो लोक मरण पावले. त्यांच्या पुढच्या पिढ्या आजही या विषारी वायूचे परिणाम भोगत आहेत. सरकारनं मदतीचे उपाय लागू केलेत, मात्र ते अपुरे ठरले आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी अजूनही विषारी कचरा पडून आहे. सरकारनं सर्व दावे करूनही हा विषारी कचरा जाळता आलेला नाही. दोषींना शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.

अशा प्रकारे घडली जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना : भोपाळ गॅस दुर्घटनेत १५,००० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा अपघात २ आणि ३ डिसेंबर १९८४ च्या रात्री झाला. या घटनेनंतर शहरात मृतदेहांचा खच पडला होता. झालं असं की, १९६९ मध्ये युनियन कार्बाइडनं भोपाळमध्ये UCIL कारखाना बांधला होता. यामध्ये मिथाइल आयसोसायनाइडपासून कीटकनाशकाची निर्मिती सुरू झाली. पुढे १९७९ मध्ये मिथाइल आयसोसायनाइड निर्मितीसाठी येथे नवीन कारखाना सुरू करण्यात आला. मात्र यासाठी जबाबदार असलेल्यांनी त्याच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केली नाही. २ आणि ३ डिसेंबरच्या रात्री याचे परिणाम दिसले. कारखान्याच्या ए ६१० क्रमांकाच्या टाकीमध्ये पाणी शिरलं. मिथाइल आयसोसायनेटमध्ये पाणी मिसळल्यानं टाकीतील तापमान वाढलं आणि त्यानंतर विषारी वायू वातावरणात पसरला.

१५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू :या दरम्यान,४५ मिनिटांत सुमारे ३० मेट्रिक टन गॅसची गळती झाली. वायूचे हे ढग संपूर्ण शहराच्या वातावरणात पसरले आणि त्यासोबतच शहरात मृत्यूचं तांडव सुरू झालं. या वायूच्या संसर्गामुळे १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पण हे इथेच थांबलं नाही. या दुर्घटनेतून बचावलेले देखील या वायूच्या प्रभावापासून वाचू शकले नाहीत. या वायूचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांमध्ये अपंगत्वाच्या रूपात दिसून आला.

मृत्युमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही : या विषारी वायूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा अधिकृत आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही. वेगवेगळ्या स्त्रोतांनी वेगवेगळा आकडा सांगितलेला आहे. अधिकृत मृतांची संख्या सुरुवातीला २२५९ नोंदवण्यात आली. तर मध्य प्रदेशच्या तत्कालीन सरकारनं ३,७८७ लोक गॅसच्या संपर्कात आल्याची पुष्टी केली होती. इतर अंदाजानुसार केवळ दोन आठवड्यांत ८००० लोक मरण पावले. उर्वरित ८००० लोक गॅस संबंधित आजारांमुळे मरण पावले.

३९ वर्षांनंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत : भोपाळ गॅस दुर्घटनेच्या जखमा ३९ वर्षांनंतरही ताज्या आहेत. विषारी वायूनं ​​ग्रासलेल्या पीडितांना आणि त्यांच्या पिढ्यांना फार मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागला. मात्र त्यानंतरही पीडित न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या युनियन कार्बाइडच्या वतीनं आजपर्यंत न्यायालयात कोणीही हजर झालं नाही. याप्रकरणी गॅस पीडितांनी भोपाळ कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिका करणारे भोपाळ ग्रुप फॉर इन्फॉर्मेशन अँड अ‍ॅक्शनचे सतीनाथ सदांगी सांगतात, "इतक्या वर्षांनंतरही या प्रकरणात सरकारकडून केवळ युक्तिवाद आणि पुरावे सादर केले जात आहेत. अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे." युनियन कार्बाइडचे अध्यक्ष आणि तत्कालीन सीईओ वॉरेन अँडरसन यांचं यापूर्वीच निधन झालंय.

हेही वाचा :

  1. युनियन कार्बाईड कर्मचाऱ्यांचा दावा फेटाळला; भोपाळ गॅस कांडावर वेब सिरीजला उच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल

ABOUT THE AUTHOR

...view details