श्रीनगर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी रविवार हा महत्त्वाचा दिवस ठरला आहे. राहुल गांधींनी तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेराही उपस्थित होत्या. आता लाल चौकानंतर 'भारत जोडो यात्रा' बुलेवर्ड परिसरातील नेहरू पार्कच्या दिशेने निघेल, जिथे 30 जानेवारीला ही 4,080 किमी लांब पदयात्रा संपणार आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास देशभरातील 75 जिल्ह्यातून गेला आहे.
उद्या काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवतील : सात किलोमीटरचे अंतर कापून 'भारत जोडो यात्रा' श्रीनगरच्या सोनवार भागात पोहोचली आणि तेथे काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका लाल चौक सिटी सेंटरकडे रवाना झाले. राहुल गांधी यांनी येथे तिरंगा फडकवला. लाल चौकाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे आणि शहराच्या मध्यभागी बहुस्तरीय सुरक्षा गराडा घालण्यात आला आहे. सोमवारी, राहुल गांधी श्रीनगरमधील एमए रोडवरील काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवतील. त्यानंतर एसके स्टेडियममध्ये जाहीर सभा आयोजित केली जाईल. या जाहीर सभेसाठी 24 विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सायंकाळी पत्रकार परिषद : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' रविवारी शेवटच्या दिवशी श्रीनगरमधील पांथाचौक येथून निघाली. पांढरा टी-शर्ट परिधान करून, राहुल गांधी आणि त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी सकाळी 11.45 वाजता पदयात्रेला सुरुवात केली. यादरम्यान हजारो काँग्रेस समर्थक राष्ट्रध्वज आणि काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन राहुल आणि प्रियंका यांच्यासोबत फिरताना दिसले. ते पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर सोमवारी श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होणार आहे.
समारोप समारंभात 24 पक्षांना निमंत्रण : गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा 30 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपणार आहे. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर होणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी काँग्रेसला मोठी गर्दी अपेक्षित आहे. पक्षाकडून समान विचारसरणी असलेल्या प्रादेशिक पक्षांना आणि त्यांच्या विरोधी पक्षांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशभरातील 24 पक्षांना समारोप समारंभात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रणे पाठवली होती. मात्र, समारोप सोहळ्याला समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, माकपचा कोणताही नेता येणार नाही. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्तीही शनिवारी यात्रेत सहभागी झाल्या होत्या. मेहबूबा मुफ्ती आपल्या मुलीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा :Bharat Jodo Yatra Today : काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेला स्थानिकांचा मोठा पाठिंबा, यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत