नवी दिल्ली Bharat Nyay Yatra : काँग्रेस नेता राहुल गांधी आता पूर्वेकडून पश्चिमेच्या प्रवासाला निघणार आहेत. काँग्रेस पक्षानं आज 'भारत न्याय यात्रे'ची घोषणा केली. ही यात्रा 14 जानेवारीला मणिपूरच्या इंफाळमध्ये सुरु होऊन 20 मार्चला मुंबईत संपेल. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहेत. ही 'भारत न्याय यात्रा' 6200 किलोमीटरचे अंतर कापणार असल्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलंय.
कोणत्या राज्यातून जाणार यात्रा : भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांमधून जाणार आहे. ही यात्रा 6200 किलोमीटरचं अंतर पार करेल, अशी माहिती कॉंग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिलीय.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे दाखवणार हिरवा झेंडा : 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांतून जाणार्या या यात्रेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे माणिपूरच्या इंफाळ इथं हिरवा झेंडा दाखवतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार आहे, त्यातील काही राज्यांमध्ये सध्या 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या पक्षांची सत्ता आहे. त्यामुळं हे पक्ष काँग्रेसच्या यात्रेत सहभागी होतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'भारत जोडो' यात्रेचा कॉंग्रेसला फायदा : यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी इथं 7 सप्टेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. 3,970 किमी अंतर, 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून 130 दिवसांपेक्षा जास्त काळ चालल्यानंतर 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये या यात्रेचा प्रवास संपला होता. या यात्रेचा फायदा काँग्रेसला हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झाला होता.
हेही वाचा :
- "आपण विश्वचषक जवळपास जिंकलाच होता, मात्र 'पनौती'मुळे...", राहुल गांधींची मोदींवर नाव न घेता टीका
- 'सरकारनं तरुणांची मेहनत वाया घालवली', अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा