नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामुळे वाहनांच्या वाहतुकीसह सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. यावेळी, प्राणीसंग्रहालय प्रशासनाने वन्यजीवप्रेमींना त्रास होऊ नये यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
प्राणीसंग्रहालय प्रशासन वन्यजीवांची माहिती फेसबुकवर शेअर करत आहे. ज्याद्वारे पर्यटक दिवसभर वन्यजीवांची छायाचित्रे आणि व्हिडिओ फेसबुकवर पाहू शकतात. घरी बसूनच प्राणीसंग्रहालयात गेल्याचा आनंद ते घेऊ शकतात.
याबाबत प्राणीसंग्रहालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले, की लॉकडाऊनमुळे पर्यटक प्राणीसंग्रहालयात येऊ शकत नाहीत. परंतु, त्यांचा रस लक्षात घेऊन आम्ही प्राणीसंग्रहालयातील वन्यजीवांच्या हालचाली आणि त्यांच्या दररोजच्या कार्याची ओळख करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे वन्यजीवांचे खाणे-पिणे यासंबंधित सर्व क्रिया फेसबुक पेजवर फोटो आणि व्हिडिओसह शेअर केले जात आहेत. तसेच हे काम आणखी वेगवान करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. जेणेकरुन वन्यजीवांशी संबंधित सर्व माहिती पर्यटकांना लवकरात लवकर मिळेल.
संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण खबरदारी -
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि वन्यजीवांमध्येही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने प्राणीसंग्रहालय प्रशासन सतर्क झाले आहे. प्राणीसंग्रहालयाचे संकुल पूर्णपणे स्वच्छ केले जात आहे. याशिवाय प्राणीसंग्रहालयातील कामगारांना सॅनिटायझर आणि मास्कदेखील देण्यात आले आहेत.