विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी (वायएसआरसीपी) माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वाहनांच्या ताफ्यावर चप्पलफेक केल्याची घटना घडली. विशाखापट्टणम विमानतळावर नायडू यांची 'प्रजा चैतन्य यात्रा' आली होती. त्यावेळी वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केल्याची माहिती नायडूंनी दिली.
चंद्राबाबू नायडू हे पुलिवेंदुला भागातील नागरिकांची भेट घेणार होते. या भागातील काही नागरिकांच्या जमिनीवर वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी कब्जा केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात नायडू त्यांची भेट घेणार होते. मात्र, नायडू विमानतळावर येताच जगनमोहन रेड्डींच्या कार्यकर्त्यांनी चंद्राबाबूंना घेराव घालत त्यांच्याविरोधी घोषणाबाजी केली. आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांच्या धोरणाला विरोध केल्याने चंद्राबाबूंना विशाखापट्टणमला येण्याचा अधिकार नसल्याचे वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.