बिहार -भागलपूरचा युवा शास्त्रज्ञ गोपाल जी सध्या उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये संशोधन करत आहे. यंगेस्ट साइंटिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोपालला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासापर्यंतच्या आतापर्यंत तीन ऑफर्स आल्या होत्या. मात्र, त्या त्याने धुडकावून लावल्या. त्याला देशात राहूनच आपल्या देशवासियांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे.
गोपालचे वडील शेती करत असत. लहानपणी शेतात अनेकदा केळ्यांच्या रसाचा डाग कपड्यांवर लागलेला पाहून त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले की, केळ्याचा डाग पडला की तो का बरं जात नसेल? अशा प्रकारच्या काही घटनांनंतर गोपालची याविषयी संशोधन करण्याची इच्छा झाली. लहानपणापासूनच त्याने केळीच्या सोपावर संशोधन सुरू केले.
'या' यंगेस्ट साइंटिस्टला देशासाठी काही करण्याची दुर्दम्य इच्छा गोपालजीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, तेव्हा पंतप्रधानांनी प्रभावित होऊन त्यांना अहमदाबादच्या संशोधन केंद्रात पाठवले. येथे गोपालने सहा प्रकारचे संशोधन केले आणि दोन संशोधनांचे पेटंट मिळवले. सध्या तो बनाना नॅनो क्रिस्टल आणि बनाना नॅनो फायबरवर काम करतो आहे. याशिवाय, तो गोपोनियम अलॉयवरही त्याने संशोधन केलेय. याच्याद्वारे सूर्याची उष्णता मोजता येते. याच संशोधनासाठी नासाने गोपालला आमंत्रित केले होते.
ही सर्व परमेश्वराची कृपा आहे, असे शास्त्रज्ञ गोपालचे मोठे काका चित्तरंजन कुमार यांनी म्हटले आहे. अनेक समस्या आणि आव्हानांचा सामना करत शिक्षण घेणाऱ्या गोपालने आपल्या उमेदीची मोठी झेप घेत हे सर्व साध्य केलेय. गोपालजीच्या संशोधनात केळीचे सोप आणि रसापासून हेअर डाय, लिथिअम बॅटरी, बायो सेल, स्युडो प्लॅस्टिकसारख्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. गोपाल आई-वडील, गाव, राज्य आणि देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्वांना वाटत आहे.