‘मोदींना मत दिलंत ना, मग कामाचं पण त्यांनाच विचारा,’ मुख्यमंत्री कुमारस्वामी आंदोलकांवर भडकले - cm kumaraswamy
या प्रकारावरून मोदी लाटेत पराभव झाल्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांना नैराश्याने ग्रासल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते मोदींना मते दिल्याच्या रागातून लोकांवरच संताप व्यक्त करत आहेत.
बंगळुरु - रोजगाराबाबत जाब विचारणाऱ्या आंदोलकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अजब उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तराने आंदोलकांसह त्यांचे समर्थकही अवाक् झाले. येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनचे कर्मचारी मुख्यमंत्र्यांविरोधात वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात आंदोलन करीत होते. भडकलेल्या कुमारस्वामींनी त्यांना आपले प्रश्न घेऊन चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यास सांगितले.
मुख्यमंत्री कुमारस्वामी बसने कारेगुड्डा गावाकडे एका निवासी कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान त्यांची बस रायचूर येथे पोहोचल्यानंतर तेथे येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनच्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते. या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बससमोर 'शेम, शेम,' 'धिक्कार असो' अशी घोषणाबाजी केली तसेच रोजगारांसंदर्भात त्यांना जाब विचारला. त्यावर कुमारस्वामींनी त्यांच्यावर ओरडत आणि हातवारे करत ‘मोदींना मत दिलंत ना, मग कामाचं पण त्यांनाच विचारा,’ असे सुनावले. त्यांच्या या त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुख्यमंत्र्यांच्या या अजब सल्ल्यामुळे आंदोलकही क्षणभर अचंबित झाले.