लखनौ - देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशातील योगी सरकारने कडेकोट बंद पाळण्यासाठी कंबर कसली आहे.
जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बस, मेट्रो आणि रेल्वे बंद ठेवण्यात येणार आहे. भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या जनतेला धीर देताना योगी म्हणाले, 'या संकटामुळे घाबरून जाऊ नका. सरकारने सर्व त्या उपाययोजना केल्या असून औषधेही पुरेशा प्रमाणात आहेत'.
शिवाय या कर्फ्यूमुळे कोणाचेही खाण्यापिण्याचे हाल होऊ नये याची काळजी देखील योगी सरकारने घेतली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या ३५ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. यामध्ये २० लाख ३७ हजार बांधकाम मजुरांचा समावेश आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे बंदमुळे हाल होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तरप्रदेश राज्यामध्ये आत्तापर्यंत २४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ९ रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. राज्यामध्ये पुरेसे विलगीकरण वार्ड उपल्बध असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.