महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

योगी सरकार सगळ्याच आघाड्यांवर नापास, काँग्रेसची टीका - अजय कुमार लल्लू बातमी

सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी झाले आहे. त्यामुळे ते आता विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांनी योगी सरकारवर केली.

UPCC chief Ajay Lallu
अजय कुमार लल्लू

By

Published : Oct 24, 2020, 9:06 PM IST

लखनऊ - योगी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी झाल्याची टीका उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू यांनी केली आहे. राज्य सरकारच्या अपयशावर काँग्रेस पक्ष आवाज उठवत आहे. मात्र, सरकार सुडबुद्धीने वागत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

राज्यात महिला अत्याचाराच्या दररोज १६४ तक्रारी

राज्यातील महिलांविरोधात वाढत्या गुन्ह्यांवरूनही त्यांनी योगी सरकारला लक्ष्य केले. प्रत्येक दिवशी राज्यात महिला अत्याचाराचे गुन्हे नोंद होत आहेत. १६४ तक्रारी प्रत्येक दिवशी नोंद होत आहेत. मात्र, सरकार राजकीय सभा घेण्यात व्यग्र आहे, असे अजय कुमार लल्लू म्हणाले.

अजय कुमार लल्लू ईटीव्हीशी बोलताना

कायदा सुव्यवसस्था धोक्यात

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्यानंतर सरकारने अनेक राजकीय नेत्यांना ताब्यात घेतले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावर विचारले असता, ते म्हणाले, सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी झाले आहे. त्यामुळे ते आता विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

हाथरस प्रकरणावरून योगी बॅकफूटवर

हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर विरोधकांनी योगी सरकारला धारेवर धरले होते. जिल्ह्यातील एका दलित तरुणीवर चार सवर्ण तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच तिला गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली. हे प्रकरण नीट हाताळले नसल्यावरून योगी आदित्यनाथ सरकारवर मोठी टीका झाली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details