लखनऊ- हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यात आणि संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. दरम्यान, योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार: पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन
योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाईचे आदेश दिले आहेत.
तसेच या घटनेशी संबंधी वादीप्रतिवादी सर्वांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राथमिक चौकशी अहवालानंतर योगी सरकारने ही कारवाई केली. योगी आदित्यनाथ यांनी आज एक ट्विट केले आहे. 'उत्तर प्रदेशातील आयाबहिणींच्या स्वाभिमानाला धोका पोहचवण्याचा विचारही कोणी मनात आणला तर, त्याचा समूळ नाश निश्चित आहे. गुन्हेगारांना अशी शिक्षा मिळेल की, ज्यामुळे लोकांपुढे एक उदाहरण उभे राहील. उत्तर प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कटीबद्ध आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.