लखनऊ - उत्तर प्रदेश सरकारने कोरोना विषाणूशी लढा देतानाच कुटीरोद्योगाला चालना देणाराही एक मार्ग शोधला आहे. सरकार राज्यातील 23 कोटी जनतेसाठी 66 कोटी मास्क बनवणार आहे. हे मास्क बनवण्याची जबाबदारी राज्यातील खादी आणि ग्रामोद्योग विभागाला दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विषाणूशी लढण्यासंदर्भात टीम-11 सोबत झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले.
राज्यातील 23 कोटी जनतेसाठी 66 कोटी तीन पदरी खादीच्या कापडाचे मास्क तयार करण्यात येणार आहेत. सरकारतर्फे गरिबांना हे मास्क मोफत मिळतील. बाकी लोकांना अत्यंत रास्त दरात हे मास्क उपलब्ध होतील. हे मास्क कपड्याचे बनवले असल्याने ते धुऊन पुन्हा पुन्हा वापरणे शक्य होणार आहे.
प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य असेल
सरकारतर्फे राज्यात हे मास्क वितरित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाला दोन मास्क दिले जातील. लॉकडाऊन संपल्यानंतरही 'इपिडेमिक अॅक्ट'अंतर्गत सर्वांना मास्क वापरणे अनिवार्य असेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मास्क शिवाय कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी असणार नाही असे थेट निर्देश दिले आहेत. यामुळे प्रत्येक नागरिकाला मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे
उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व नागरिकांना कोणाच्या संक्रमणापासून बचाव करता येणार आहे. तसेच, दुसर्या बाजूला मास्क बनवणाऱ्या श्रमिकांना ही याचा अर्थिक लाभ मिळेल. सरकारने स्वदेशी खादीच्या कपड्यापासून हे मास्क बनवण्याची जबाबदारी खादी ग्रामोद्योग विभागाकडे सोपवली आहे. हे मास्क लवकरात लवकर तयार करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.