नवी दिल्ली -दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (डीपीसीसी) लॉकडाऊनदरम्यान यमुना नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याचे सांगितले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार यमुना नदीचे पाणी आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाले आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहेत. औद्योगिक कचरा नदीच्या पाण्यात मिसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, नदीच्या उगम स्थानाकडून आणि उपनद्यांकडून स्वच्छ आणि ताजे पाणी दररोज नदीच्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळत आहे. यामुळे नदीचे पाणी स्वच्छ झाले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने यमुना देखरेख समितीची नेमणूक केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला सीपीसीबी आणि डीपीसीसी यांनी यमुना नदीच्या पाण्याच्या शुद्धतेसंदर्भात काही विशेष चाचण्या केल्या. या चाचण्यांमधून नदीचे पाणी अधिकाधिक स्वच्छ होत असल्याचे समोर आले आहे. आधीच्या तुलनेत तब्बल पाच ते सहा पटीने स्वच्छ झाल्याचे निदर्शनास आले आहे.