पणजी- 'आपला मृत्यू हा आनंद सोहळा व्हावा' अशी इच्छा प्रसिद्ध साहित्यिक तथा गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आज त्यांना शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत अंतिम निरोप देण्यात आला. फोंडा नगरपालिकेच्या मुक्तीधाम स्मशानभूमीत प्रियदर्शन आणि गगनसूर्या या त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्या चितेला मुखाग्नी दिला.
दक्षिण आफ्रिकेत हवापालट करण्यासाठी गेले असता ८ फेब्रुवारीला वाघ यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या पत्नी अरूणा यांनी दि. १३ रोजी दिली. त्यानंतर आज पहाटे ३ च्या सुमारास मृतदेह विमानाने गोव्यात आणण्यात आला. पार्थिव प्रथम ढवळी-फोंडा येथील त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास बांदोडे-फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या सभागृहात लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
वाघ यांनी सर्वसामान्य आणि सर्वपक्षीय जनतेच्या मनात निर्माण केलेल्या प्रेमामुळे आज सकाळपासूनच लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यामध्ये कुटुंबीय, राजकारण, साहित्य, समाजकारण, मित्र यांच्याबरोबरीने सर्वसामान्य गोमंतकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला मृत्यू हा आनंद सोहळा व्हावा, अशी इच्छा 'मरणापूर्वीच्या काही सूचना' या कवितेतून वाघ यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचे पार्थिव शरीर जेथे अंतिम दर्शनासाठी ठेवले होते. त्या सभागृहासमोरील मैदानात मित्र परिवारातर्फे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विष्णू वाघ यांच्या कवितांचे संगीतबद्ध सादरीकरण बाळकृष्ण मराठे यांनी केले. तर यावेळी त्यांच्यावरील कवितादेखील सादर करण्यात आल्या. दरम्यान, त्यांच्या चाहत्यांनी संतूर, बासरी, गिटार आदी वाद्य वाजवून आदरांजली वाहिली. यावेळी काहींनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पदर उलगडून दाखवले.
यावेळी प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले, विष्णू वाघ म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र यांना जोडणारा सांस्कृतिक दूवा होता. त्यांनी आपल्या साहित्यातून गोव्याच्या मातीचा सुगंध महाराष्ट्रात पोहोचवला. त्यांची भूमिका ही नेहमीच समाज जोडण्याची राहिली.
२०१८ मध्ये 'सूदीरसूक्त' या वाघ यांच्या कोकणी कविता संग्रहाला सरकारी पुरस्कार देण्यावरून मोठे वादळ उठले होते. त्यामुळे सरकारने ते पुरस्कारच रद्द केले. हाच धागा पकडून बोलताना साहित्यिक एन. शिवदास म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून वाघ यांनी गोव्यातील बहुजन समाजावरील अन्यायाला वाचा फोडली. ज्या समाजात जन्मलो तो समाज सामाजिक अन्यायाविरुद्ध पेटून उठवू अशी त्यांची इच्छा होती. तसेच सरकारने सदर पुरस्कार वितरित का केले नाही, याचा जाब विचारावा. त्यांना हा पुरस्कार मिळवून देणे हीच खरी श्रद्धांजली असेल.
विष्णू वाघ यांचे अंत्यदर्शन घेताना चाहते गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री आणि या कार्यक्रम आयोजनासाठी पुढाकार घेतेलेल्या गोविंद गावडे यांनी 'मरणापूर्वीच्या काही सूचना' ही कविता सादर केली. त्यानंतर इस्लाम आणि ख्रिश्चन यांनीही प्रार्थना केली. तद्नंतर दुपारी ३ च्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. तत्पूर्वी गोवा पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, सभापती डॉ. प्रमोद सावंत, महसूल मंत्री रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री रवी नाईक उपस्थित होते.