हैदराबाद - जागतिक मृदा दिन ५ डिसेंबरला जगभरात पार पडला. मृदा म्हणजेच माती. मातीचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मातीची जैवविविधता जेवढी जास्त राहिल तेवढे अन्नधान्याचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल. प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड, रासायनिक खतांचा वापर, उद्योगधंद्यातून बाहेर पडणारे सांडपाणी यामुळे माती प्रदुषित होते. यासोबतच इतर अनेक कारणे आहेत, ज्यामुळे मातीत प्रदूषके मिसळतात. मृदा संवर्धनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवणं गरजेचं बनलं आहे. माती संरक्षणाची जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढे येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल.
जैवविविधता काळाजी गरज -
जैवविविधतेचा ऱ्हास हा सर्वांसाठीच काळजीचा विषय आहे. जेव्हा आपण शाश्वत विकासासंदर्भात बोलतो, तेव्हा मात्र, जमिनीखालील जैवविविधतेला जास्त महत्त्व दिलं जात नाही. जागतिक स्तरावरील फूड आणि अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने या वर्षी मृदा संवर्धन दिनाच्या निमित्ताने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात मातीच्या संवर्धानावर विशेष भर देण्यात आला आहे. जमिनीखाली सुमारे २५ टक्के जैव विविधता समावलेली आहे. पृथ्वी तलावावरील ४० टक्के जीवांचा त्यांच्या जीवनचक्रात मातीशी संबंध येतो. विविध प्रकारचे जंतू, जीवाणू, लहान प्राणी, सुक्ष्मजीव मातीत राहतात. पिकांच्या वाढीसाठी त्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे मातीही सुस्थितीत राहते.