जागतिक छायाचित्रण दिवस (वर्ल्ड फोटोग्राफी डे) हा छायाचित्रणाच्या अविश्वसनीय वाटणाऱ्या कलाप्रकाराला सन्मानाचे स्थान देणारा दिवस आहे. हा दिवस कला, हस्तकला, विज्ञान आणि छायाचित्रणाच्या इतिहासाचा जगभरात साजरा होणारा उत्सव आहे. छायाचित्रणाविषयी चर्चा करणे आणि ज्यांना छंद किंवा करिअर म्हणून फोटोग्राफी करण्याची इच्छा आहे त्यांना प्रोत्साहित करणे ही या दिवसामागील संपूर्ण कल्पना आहे. तसेच, या निमित्ताने या क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलाकारांची आठवणही करून दिली जाते.
1837 मध्ये लुईस डाग्यूरे आणि जोसेफ निसेफोर निप्से यांनी विकसित केलेल्या डागुएरोटाइप प्रक्रियेची आठवण म्हणून या दिवशी जागतिक छायाचित्रण दिवस साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच, फोटोग्राफी हे जगभरातील असंख्य लोकांचे वैयक्तिक अभिव्यक्तीचे आणि कौतुकाचे माध्यम बनले असून त्याचा वापर वाढतच आहे.
छायाचित्रकार ज्या नजरेतून जगाकडे पाहतो, तो दृष्टिकोन त्याने काढलेल्या छायाचित्राद्वारे ते पाहणाऱ्यापर्यंत पोहोचतो. फोटोग्राफीमुळे जगाकडे पाहण्याचे वेगवेगळा दृष्टीकोन मिळतात. तसेच, यातून भाव-भावनांचा आविष्कारही होतो. तो छायाचित्र पाहणाऱ्यांपर्यंत पोहोचवता येतो. चित्र, छायाचित्र हे जगाला जवळ आणणारे आणि संवाद प्रभावीरीत्या घडवून आणणारे माध्यम आहे. याच्या माध्यमातून अनेक दशकांच्या, शंभर वर्षांपेक्षाही जुन्या काळात डोकावता येते. छायाचित्राला माहिती प्रसाराचे माध्यम म्हणूनही पाहता येते.
हेही वाचा -मंडळी पाहिलात का? सॅनिटायझर फवारणी करणारा बाप्पा..!
छायाचित्रण कलेचा जन्म झाल्यापासून आज आपण खूप पुढे आलो आहोत. पूर्वीचे कॅमेरे इतके व्यवस्थित, सहज हाताळण्याजोगे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्याजोगे नव्हते. कॅमेऱ्यातून मिळणाऱ्या छायाचित्राचा दर्जाही आता मोठ्या प्रमाणात सुधारला आहे. सुरुवातीच्या काळात कॅमेऱ्याचा वापर केवळ खास प्रसंगी किंवा विशेष प्रकारच्या वेशभूषा, केशभूषा केल्यानंतरच होत असे. मात्र, आताच्या काळात विकसित झालेल्या कॅमेऱ्यांमध्ये आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणही पकडून ठेवू शकतो. परंतु, या कलेने आपल्या जगात क्रांती कशी आणली, हे आपण विसरत असल्याचे दिसत आहे. यामुळे याची आठवण ठेवण्यासाठी विशेष दिवस साजरा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज परवडणाऱ्या आणि चांगल्या दर्जाच्या डिजिटल कॅमेर्यांमुळे तरुणांमध्ये फोटोग्राफीचा मोठा छंद पहायला मिळतो.
फोटोग्राफी
एका चित्रात हजार शब्दांचा अर्थ सामावलोला असतो, असे म्हटले जाते. छायाचित्रे वेगवान आणि कधीकधी शब्दांपेक्षा अधिक प्रभावीपणे भावना व्यक्त करतात. सध्या तांत्रिक प्रगतीमुळे फोटोग्राफी प्रत्येक 5 पैकी एका व्यक्तीचा छंद बनली आहे. आजची पिढी सोशल मीडियावर छायाचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होण्यात आणि अनुभव सांगण्यात खूप रस घेत आहे.
खालीलप्रमाणे फोटोग्राफीचे प्रकार आहेत.
• रमणीय भूप्रदेशाचे छायाचित्रण (लँडस्केप फोटोग्राफी)
• व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट फोटोग्राफी)
• वन्यजीव छायाचित्रण (वाईल्डलाईफ फोटोग्राफी)
• प्रवास छायाचित्रण (ट्रॅव्हल फोटोग्राफी)
• रस्त्यांवर विविध बाबींचे छायाचित्रण (स्ट्रीट फोटोग्राफी)
• नवजात बालकांचे छायाचित्रण (न्यूबॉर्न फोटोग्राफी)
• अतिशय बारीक वस्तूंचे (किडे, फुलपाखरे, दवबिंदू, पाण्याचे तुषार किंवा एखाद्या वस्तूचे अतिशय जवळून घेतलेले छायाचित्र) छायाचित्रण (मॅक्रो फोटोग्राफी)
जागतिक छायाचित्रण दिनाचा इतिहास आणि मुख्य मुद्दे
पहिले छायाचित्र 1826 मध्ये हेलोग्राफी नावाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे तयार केले गेले. तो शॉट तयार करण्यासाठी एक्सपोजर वेळ 8 तासांचा होता. खगोलशास्त्रज्ञ सर जॉन हर्शेल या व्यक्तीने 1879 मध्ये 'छायाचित्र' (photograph) हा शब्द पहिल्यांदा वापरला. 9 जानेवारी 1839 रोजी फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने डॅगेरिओटाइप प्रक्रियेची घोषणा केली. 1 ऑगस्ट रोजी फ्रेंच सरकारने याचे पेटंट विकत घेतले.
थॉमस सटन यांनी 1861 मध्ये प्रथम टिकाऊ रंगाचा फोटो काढला होता. लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या फिल्टरमधून काढलेल्या तीन काळ्या-पांढऱ्या छायाचित्रांचा तो संच होता. मात्र, यातून मिळणारे छायाचित्र फारसे व्यवस्थित नव्हते. यामुळे लवकरच हा प्रकार मागे पडला.
1839 च्या सुरुवातीच्या काळात अमेरिकन रॉबर्ट कॉर्नेलियसने सेल्फी क्लिक केली होती. कॉर्नेलियसने आपला कॅमेरा सेट केला, लेन्सची कॅप काढून छायाचित्र घेण्याच्या तयारीत आल्यानंतर तो कॅमेऱ्यासमोर फ्रेममध्ये धावला. पहिले डिजिटल छायाचित्र 1957 मध्ये घेण्यात आले होते. कोडॅकच्या अभियंत्याने सर्वप्रथम डिजिटल कॅमेरा शोधण्याच्या सुमारे 20 वर्षे आधी. हा फोटो सुरुवातीला फोटोफिल्मवर घेतलेल्या शॉटचे डिजिटल स्कॅन आहे. हे रसेल किरशच्या मुलाचे छायाचित्र आहे. याचे रिझोल्यूशन 176 × 176 आहे.
पहिला डिजिटल कॅमेरा डिसेंबर 1975 मध्ये स्टीव्ह सॅसन यांनी तयार केला होता. ते ईस्टमन कोडॅक येथे अभियंता होते. कॅमेर्याचे वजन 8 पौंड होते आणि 0.01 मेगापिक्सलचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो यातून काढला गेला. हे पहिले छायाचित्र तयार करण्यास 23 सेकंद लागले. छायाचित्रांनी जग जवळ आणले आहे. हे संवादाचे एक शक्तिशाली माध्यम असल्याने त्यामध्ये मानवी जीवनास स्पर्श करण्याची क्षमता आहे.
19 ऑगस्ट, 2010 रोजी जागतिक फोटो डेने पहिल्या जागतिक ऑनलाइन गॅलरीचे आयोजन केले. जवळपास 270 फोटोग्राफरनी त्यांची छायाचित्रे शेअर केली आणि 100 हून अधिक देशांमधील लोकांनी वेबसाइटला भेट दिली. हा दिवस जागतिक स्तरावर पोहोचणारा पहिला अधिकृत छायाचित्र दिवस (फोटो डे) ठरला . 2010 पासून सर्व छायाचित्रकार जागतिक छायाचित्रण दिन साजरा करतात. हीच ती तारीख होती, जेव्हा गेली, जेव्हा फ्रेंच सरकारने डॅगेरिओटाइपचे पेटंट विकत घेतले आणि ते 'संपूर्ण जगासाठी खुले' केल्याचे जाहीर केले.
मोबाइल फोनवरील डिजिटल कॅमेर्यामुळे आज दरवर्षी जगभरात 350 अब्जपेक्षा जास्त फोटो घेतले जातात. जगातील सर्वात मोठा कॅमेऱ्यांचा संग्रह मुंबईच्या दिलीश पारेख यांच्याकडे आहे. त्याच्याकडे ४ हजार ४२५ पुरातन कॅमेऱ्यांचा संग्रह आहे. आजपर्यंत फेसबुकवर २५० अब्ज अब्जाहून अधिक फोटो अपलोड केले गेले आहेत आणि प्रत्येक दिवशी इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आलेल्या फोटोंची सरासरी संख्या सुमारे ५८ ,०००,००० आहे.
पुलित्झर पुरस्कार २०२०:
अमेरिकन पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा पुलित्झर पुरस्कार 1917 पासून देण्यात येत आहे. वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
असोसिएटेड प्रेस (एपी) मध्ये काम करणारे भारतीय फोटो-जर्नलिस्ट दार यासीन, मुख्तार खान, चन्नी आनंद यांनी 2020 मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी तरतूद रद्द केल्यानंतर तेथे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्या वेळच्या येथील परिस्थितीचे चित्रण या छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यांमधून केले होते.
छायाचित्रकारांवर कोरोनाचा प्रभाव
कोरोना विषाणूमुळे देशभर आणि जगभर पसरलेल्या महामारीमुळे सामान्य लोकांसह सर्जनशील आणि स्वतंत्रपणे काम करणारे कलाकार यांच्या जीवनावर परिणामही झाला आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील व्यवसाय संघर्ष करीत आहेत. फोटोग्राफरदेखील त्याला अपवाद नाहीत.
वन्यजीव छायाचित्रकारांना फिरणे सोपे राहिलेले नाही. याआधी हे छायाचित्रकार अर्धे वर्ष वाळवंट, जंगले आणि रानोमाळ फिरत फुटेज गोळा करत असत. त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्ससाठी ते हा मोठा साठा जमवत असत. आता त्यांना घरात रहावे लागत आहे. याविषयीचा अनुभव शाझ जंग याने शेअर केला आहे. याला 'लेपर्ड मॅन ऑफ इंडिया' असेही म्हटले जाते. त्याने वर्षानुवर्षे बिबट्याचा मागोवा घेण्यात घालवली आहेत. मात्र, भ्रमंतीवर निर्बंध असल्याने आता अशा अनेकांना काही काळ घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही.
लग्नांमध्ये होणारे फोटोशूट अनेक छायाचित्रकारांसाठी रोजी-रोटी देणारे असते. मात्र, आता लग्नांसाठी मोठ्या संख्येने एकत्र येण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे या छायाचित्रकारांचा व्यवसायही आता बसला आहे.
स्वतंत्ररीत्या काम करणार्या छायाचित्रकारांनाही विविध कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. अनेक छोट्या समारंभांपासून ते मोठ्या क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगमुळेही या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत.