दिवसेंदिवस विरळ होत चाललेल्या ओझोन आवरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ओझोच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य उपाय शोधण्यासाठी 'जागतिक ओझोन दिन' दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा होतो. ओझोन वायूचा थर सूर्यकिरणांमधील सजीव आणि पृथ्वीसाठी हानिकारक अतिनील किरण आणि इतर तीव्र किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. यामुळे पृथ्वीवरील जीवन जपण्यास मदत होते.
हे पृथ्वीसाठी अतिशय उपयुक्त असलेले ओझोनचे आवरण कमी करणार्या किंवा क्षीण करणाऱ्या पदार्थांचा वापर टाळणे किंवा नियंत्रित करणे आवश्यक आहे. तरच, ओझोन थर आपल्यासह भविष्यातील पिढ्यांसाठीचेही संरक्षण करू शकेल. जागतिक हवामान बदल आणि उष्णतावाढीच्या पार्श्वभूमीवर ओझोनचे आवरण वाचवण्यासाठी अधिकाधिक सक्रिय प्रयासांची गरज आहे. यंदा म्हणजेच 2020 साली आपण जागतिक ओझोन आवरण वाचवण्याच्या प्रयासांचे 35 वे वर्ष साजरे करत आहोत. मागील 35 वर्षांत ओझोन वायूचे आवरण वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 'जीवनासाठी ओझोन' (Ozone for life)ही यंदाची 'जागतिक ओझोन दिना'ची थीम आहे.
जागतिक ओझोन दिवसाचा इतिहास :
ओझोन थर कमी होत असल्याच्या बाबीला वैज्ञानिक आधार मिळाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला ओझोन थराच्या संरक्षणासाठी यंत्रणा तयार करणे भाग पडले. व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला 28 देशांनी मान्यता दिली आणि 22 मार्च 1985 ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. सप्टेंबर 1987 मध्ये ओझोन लेअर कमी करणार्या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला.
• 16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.
• ओझोनचा थर वाचवण्यासाठीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी या आवरणाला छिद्र पडल्याचे समोर आले.वाहने, कारखाने आणि इतर कारणांनी उत्सर्जित होणाऱ्या हानिकारक रासायनिक वायूंमुळे ओझानवर विपरीत परिणाम होत आहे. हा परिणाम आणखी 50 ते 100 वर्षे चालू राहण्याची शक्यता आहे. या कारणाने या विषयाचा पर्यावरणाच्या अभ्यासात विविध अभ्यासक्रमांत समावेश करण्यात आला आहे.
• मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी 15 ऑक्टोबर 2016 मध्ये रवांडा येथील किगाली येथे 28 व्या बैठकीदरम्यान हायड्रोफ्लुरोकार्बनची पातळी खाली आणण्यासंबंधी करार केला. हा करार किगाली करार म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा -रेल्वेगाडी, रेल्वे स्थानके आणि परिसरात भीक मागणे हा गुन्हा ठरवला जाऊ नये
ओझोनचे आवरण विरळ होण्याची कारणे:
क्लोरीन किंवा ब्रोमिन असलेली मानवी निर्मित रसायने ही ओझोन थराची क्षति करणारे मुख्य घटक आहेत. ही रसायने ओडीएस म्हणून ओळखली जातात. ध्रुवीय प्रदेशांत ओझोनचा थर विरळ झाल्याचे समोर आले आहे. मुख्यत: ओझोन थराला हानी पोहोचवणार्या पदार्थांमध्ये क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी), कार्बन टेट्राक्लोराईड, हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन (एचसीएफसी) आणि मिथाइल क्लोरोफॉर्म यांचा समावेश आहे. हॅलोन्स, ब्रॉमिनेटेड फ्ल्युरोकार्बन म्हणून ओळखले जाणारे पदार्थ हेही ओझोनच्या थराला हानी पोहोचवतात. या ओडीएस पदार्थांचे आयुष्य सुमारे 100 वर्षे असते.