नवी दिल्ली - लडाखमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांबद्दलचे दु:ख शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण असून, जवानांच्या बलिदानाबद्दल मी आदरांजली वाहतो. या संकट काळामध्ये आम्ही तुमच्या कुटुंबासोबत उभे आहोत. अशा शब्दांमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे हुतात्मा जवानांबद्दल ट्टीटरवरून व्यक्त झाले आहेत. लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत.
सीमा वादाप्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक -
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 23 जूनला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चीन, नेपाळ सीमावादांसह कोरोना संकट, आर्थिक मंदी, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरही चर्चा करण्यात येणार आहे.
सोनिया गांधीच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. विशेष प्रतिनिधी, वरिष्ठ काँग्रेस नेते आणि काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीत भाग घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमावाद सोडविण्यासाठी भारत हा चीन आणि नेपाळशी राजनैतिक आणि लष्करीस्तरावर चर्चा करत आहे. या प्रश्नासंबंधी सर्व विरोधी पक्षांना भाजप सरकारने विश्वासात घ्यावे, अशी मागणी काँग्रेसची आहे.
काय घडलं भारत-चीन सीमेवर -
सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.