भोपाळ - लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यांमध्ये मजूर अडकून पडले आहेत. कोणत्याही परिस्थितीत घरी जाण्यासाठी मजूरांची धडपड सुरु आहे. हातातील काम गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मजूर जीव धोक्यात घालून हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत मूळगावी निघाले आहेत. एक महिला तान्ह्या मुलाला कडेवर घेवून गुजरात ते उत्तरप्रदेश प्रवास करत असतानाचा हृद्यद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. लहान मुलगा कडेवर तर एका हाताने बॅग ओढत ही महिला सुरतवरून उत्तरप्रदेशातील अलाहाबाद येथे जात आहे.
कडक उन्हामध्ये जीवाची पर्वा न करता टाकतेय एकएक पाऊल
तिच्या हातातील तान्हं मुलही उन्हामुळे घायाळ झालं आहे. पायी चालत तिने मध्यप्रदेशातील इंदूरपर्यंतचे अंतर कापले. तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. रस्त्याने जाणाऱ्या एका प्रवाशाने महिलेची चौकशी केली. तिला थंड पाणी प्यायला दिले. कारखाने बंद झाल्यामुळे पैसे नाहीत. उपासमार होण्यापेक्षा पायीच घरी जात आहे. रस्त्याने खायला प्यायलाही मिळत नसल्याचे तिने सांगितले. तिच्यासोबत इतरही चौदाजण आहेत, सर्वजण पायीच हजारो किलोमीटर निघाले आहेत.
तान्ह्या मुलाला कडेवर घेवून महिलेचा गुजरात ते उत्तरप्रदेश प्रवास सरकार स्थलांतरित मजूरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सोय करत आहे. मात्र, सर्वांनाच घरी जायला मिळत नाही. अशा पायी प्रवासात महिला आणि तिच्या बाळाचा उन्हामुळे जीवही जाण्याची शक्यता आहे. मात्र, मजुरांच्या मदतीसाठी कोण येणार? सरकारने परदेशात अडकेल्या नागरिकांसाठी विशेष विमाने पाठविण्याची तयारी सुरु केली आहे, मात्र, देशातील मजूरांच्या अवस्थेकडेही लक्ष द्यावे.
या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अप्पर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर महिलेला जेवण देण्यात आले. तसेच एका ट्रकमध्ये बसवून भोपाळला पाठविण्यात आले. मात्र, भोपाळनंतर ती पुढचा प्रवास कसा करणार? लॉकडाऊनमुळे मजूरांचे हाल या व्हिडिओमुळे समोर आले. हजारो मजूर असे पायी प्रवास करत घरी निघाले आहेत. त्यांचे काय होणार हा प्रश्न आहे.