चंदीगढ :हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका २१ वर्षीय तरुणीची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बल्लाबगढमध्ये एका महाविद्यालयाच्या बाहेर ही घटना घडली. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
VIDEO : भरदिवसा तरुणीची गोळी घालून हत्या; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद मैत्रिणी ओरडत राहिल्या, आणि हल्लेखोर पसार झाले..
ही तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत परिक्षा देऊन महाविद्यालयातून बाहेर आली होती. त्याचवेळी हल्लेखोर एका कारमधून त्याठिकाणी आले, आणि त्यांनी तिला मैत्रिणींपासून वेगळे केले. त्यांनी जबरदस्ती करत तिला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रतिकार करताच तिला गोळी मारुन हल्लेखोर पसार झाले. बल्लाबगढचे सहआयुक्त जयवीर सिंग राठी यांनी याबाबत माहिती दिली.
एका आरोपीची ओळख पटली..
राठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात एका आरोपीची ओळख पटली आहे. तौसिफ असे या आरोपीचे नाव आहे. तो तरुणीच्या ओळखीचा होता असे राठी यांनी सांगितले. तसेच, व्हिडिओच्या आधारे त्याचा आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती जयवीर यांनी दिली.
हरियाणातील गुन्ह्यांमध्ये वाढ..
गेल्या काही दिवसांमध्ये हरियाणातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच हरियाणातील एका सुधारगृहातून काही बालगुन्हेगार पसार झाले होते. तर हरियाणाच्या झज्जारमध्ये पाच जणांच्या टोळीने बँकेवर सशस्त्र दरोडा टाकत सात लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता.
हेही वाचा :VIDEO : भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, सात लाखांची रोकड लांबवली; पाहा व्हिडिओ