बंगळुरू -कर्नाटकमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये एका तरूणीने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीदेखील उपस्थित होते. या प्रकारानंतर त्यांनी तातडीने त्या तरूणीच्या हातातील माईक हिसकावून घेत या प्रकाराचा निषेध केला.
या तरूणीचे नाव अमूल्या असल्याची माहिती समोर येत आहे. 'संविधान वाचवा' या कार्यक्रमासाठी ओवैसी उपस्थित होते. ते व्यासपीठावर आल्यानंतर, संयोजकांनी या तरूणीला बोलण्याची संधी देत तिच्याकडे माईक सूपूर्द केला. यावेळी तिने समोरील लोकांना आपल्यासोबत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यास सांगितले.
या सर्व गोंधळानंतर पोलिसांनी त्या तरूणीला ताब्यात घेतले. त्यानंतर जमलेल्या लोकांना संबोधित करत ओवैसींना या प्रकरणाचा तीव्र निषेध केला. माझा किंवा माझ्या पक्षाचा या तरूणीशी काहीही संबंध नाही. आम्ही घडलेल्या घटनेचा निषेध करतो. कार्यक्रमाच्या आयोजकांनी तिला इथे बोलवायला नको होते. आम्ही भारतासाठी आहोत आणि आम्ही आपले शत्रूराष्ट्र पाकिस्तानला पाठिंबा देत नाही. आम्ही केवळ भारताला वाचवण्यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे ओवैसींनी स्पष्ट केले.