कोविड-19 मुळे पुढील खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बियाणे शुद्धीकरण आणि वेष्टण घालण्याच्या प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. जर उद्योगांना बियाणांवर पुढील प्रक्रिया करता आली नाही, तर पुढच्या महिन्यात देशभरात बियाणांची विक्री करणे अवघड होईल, ही बाब नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएससी) अलीकडे केंद्र आणि राज्य सरकारांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सध्याच्या हंगामात, ऑक्टोबर महिन्यात उगवलेले पिके आता काढणीच्या टप्प्यात आहेत. पिकांची कापणी झाल्यानंतर, बियाणे शेतांमधून शुद्धीकरण केंद्रात पाठवणे आवश्यक आहे. केवळ त्यांचे शुद्धीकरण आणि गुणवत्तेची चाचणी केल्यानंतरच खरीप हंगामासाठी त्यांची विक्री शक्य होईल.
तेलंगणा कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांना सुमारे 7.50 लाख क्विंटल बियाणांची सवलतीच्या दरात विक्री करण्याची योजना केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य बियाणे विकास प्राधिकरणाने शेतकऱ्यांकडून हे बियाणे खरेदी करुन शुद्धीकरण केंद्रांना पाठविणे आवश्यक आहे. बियाणे आवश्यक सेवांच्या यादीत मोडतात. सरकारने आवश्यक सेवांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे लॉकडाऊनच्या काळात बियाणे शुद्धीकरण प्रकल्प सुरु ठेवावेत अशी मागणी एनएससीचे अध्यक्ष एम प्रभाकर राव यांनी केंद्रीय कृषी सचिव आणि राज्य कृषी मंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात केली आहे.