नवी दिल्ली - संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) आणि राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (एनईईटी-यूजी) सप्टेंबरमध्ये वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनीही या विषयावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा प्रथमच जाहीरपणे बचाव केला.
कोविड - 19 च्या फैलावामुळे देशभरातील महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 'पालक व विद्यार्थ्यांच्या सततच्या दबावामुळे' या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे शासकीय प्रसार वाहिनी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत निशांक म्हणाले.
जेईई परीक्षेला बसणाऱ्या 80 टक्के विद्यार्थ्यांनी आधीपासूनच प्रवेशपत्रे डाउनलोड केली आहेत, असे ते म्हणाले. 'आणखी किती काळ अभ्यास करत रहावा लागेल, या चिंतेत विद्यार्थी होते,' असे शिक्षणमंत्र्यांनी डीडी न्यूजला सांगितले. दरम्यान, जगात आणि देशात कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन सर्व व्यवस्था केली जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -अयोध्या मशीद निर्माणासाठी IICF लोगो जारी, ही आहेत खास वैशिष्ट्ये