महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक ! नवऱ्याने पेटवले घर; पत्नीसह मुलगी ठार, चिमुकली गंभीर

रोहतक जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास राजेश नामक आरोपीने स्वत:च्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत घरात झोपून असलेली त्याची पत्नी आणि ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला झाला. तर, दुसरी एक मुलगी गंभीररित्या भाजली गेली असून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवऱ्याने पेटवले घर
नवऱ्याने पेटवले घर

By

Published : Jun 10, 2020, 5:06 PM IST

चंडीगड - हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत घरात असलेली त्याची २८ वर्षीय पत्नी मंजू आणि ३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून दोन वर्षीय मुलगी ही गंभीर स्वरुपात भाजली गेली आहे. राजेश (वय ३२) असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी, राजेशची पत्नी मंजू ही तिच्या दोन मुलींबरोबर घरात झोपलेली होती. यावेळी राजेशने घराला आग लावली. या घटनेत मंजू आणि तिच्या ३ वर्षीय मुलीचा भाजून मृत्यू झाला, तर २ वर्षीय लहान मुलगी ही गंभीररित्या भाजली. तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी मंजूचे वडील राजेश सिंह यांनी तक्रार दाखल केली असल्याचे, पोलीस अधिकारी, कुलदीप सिंह यांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासणी केली असता, मंजू आणि तिच्या ३ वर्षीय मुलीचा मृतदेह हा भाजलेल्या अवस्थेत कॉटवर आढळून आला. तर, २ वर्षीय मुलगी ही एका बाजुला असल्याने ती वाचली. मात्र, आगीमध्ये ती देखील गंभीररित्या भाजली गेली असून तिलाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सिंह यांनी सांगितले.

महेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि मंजूचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर राजेश हा मंजूला त्रास देत होता. या प्रकरणी पोलीस राजेशला अटक करण्यास सरसावले असता आरोपीने पोलिसांवर दगडफेक केली. मात्र, शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनासह, पोलिसांवर हल्ला करण्याबाबतचा गुन्हाही नोंदवण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजले नसून पोलीस आरोपीकडून कसून विचारपूस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details