हैदराबाद - सेवानिवृत्तीचे नियोजन किंवा नंतरच्या आयुष्याची तजवीज यांचे मुल्यमापन केले असता, भारताच्या गरजा इतर देशांपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीयांना लवकर सेवानिवृत्ती घ्यावी वाटते. कारण त्यांना मनापासून आवडणारी एखादी गोष्ट करण्याचे किंवा समाजकार्यात झोकून देण्याचे ध्येय डोळ्यापुढे असते. मात्र, त्यांचे सेवानिवृत्तीचे ध्येय पूर्ण करण्यात एक प्रकारची पोकळी जाणवते.
ही बाब महिलांच्या आणि विशेषतः काम करणाऱ्या महिलांबाबच अधिक प्रकर्षाने जाणवते. विविध अहवालांतून असे दिसून आले आहे की, सेवानिवृत्तीची वेळ येते तेव्हा पुरुषांच्या तुलनेत महिलांची आर्थिकदृष्ट्या तयारी कमी असते, तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीच्या गरजांची पुर्तता करण्याची देखील त्यांची विशेष तयारी झालेली नसते.
महिला, आणि काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करण्याची काही कारणे आहेत; विशेष म्हणजे, जेव्हा आपण हे जाणतो की सेवानिवृत्ती ही मिलेनिअल्स अर्थात् आजच्या तरुण पिढीच्या महत्त्वाच्या ध्येयांपैकी एक आहे. स्त्री-पुरुष वेतनातील असमानता (जेंडर पे गॅप), कौटुंबिक प्रकरणे, सरासरी आयुर्मान ही त्यापैकी काही मुख्य कारणे आहेत. या प्रत्येक पैलुवर तसेच महिलांनी आपले निवृत्त आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक नियोजन का करायला हवे असे मत लेखकाने व्यक्त केले आहे.
आर्थिक विषमता
स्त्री आणि पुरुषाला मिळणाऱ्या वेतनातील विषमता खरोखर अस्तित्वात आहे. याचाच अर्थ असा की, पुरुषांच्या तुलनेत महिलांची कमी पैशांची बचत होत असणार. लिंगभेदावर आधारित वेतनातील विषमतेव्यतिरिक्त, मुले किंवा ज्येष्ठ नातेवाईकांची काळजी घेण्यासाठी महिला अधिक काळ कामापासून लांब राहण्याची शक्यता असते. जरी अधिकाधिक पुरुषांमध्ये काळजी घेण्यासंदर्भातील अशा जबाबदाऱ्या घेण्याचे प्रमाण वाढत असले, तरी आपल्या देशात प्रामुख्याने ही भूमिका महिलाच पार पाडतात.
करिअरमधील अशा ब्रेकमुळे महिलांच्या सेवानिवृत्तीच्या तयारीला गंभीर धक्का पोहोचू शकतो, विशेषतः जर हा करिअर ब्रेक तुम्ही लवकर म्हणजे वयाच्या ३५ ते ४५ वर्षांदरम्यान घेतला असेल. हीच वेळ असते जेव्हा अनेक काम करणाऱ्या महिला आपल्या कौटुंबिक आयुष्याची सुरुवात करतात आणि याचवेळी सर्वाधिक वार्षिक वेतनाचा टप्पाही गाठलेला असतो.
परंतु, अशा महिला जेव्हा पुन्हा कामावर रुजू होतात, त्यांना कित्येक वर्षांचे वेतनातील फायदे किंवा बढती सोडून द्यावी लागते. जरी स्त्री आणि पुरुषांच्या वेतनातील विषमता कमी होत असली, यासंदर्भात अजूनही लांबचा पल्ला गाठावयाचा आहे.
जर करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही युनिट लिंक्ड विमा योजनांसारख्या (युलिप्स) शेअर बाजाराशी निगडीत उत्पादनांमध्ये अधिक पैशांची गुंतवणूक केली, तर तुम्ही काही काळासाठी काम थांबवलेले असेल तरीही तुमच्या बचतींमध्ये मात्र वाढ होत राहील. तुमच्या आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी कमी वयात नियोजन करणे आणि विवेकी पद्धतीने गुंतवणूक करणे ही तुमच्या संपत्तीचे रक्षण करण्याची गुरुकिल्ली आहे. विशेषतः महिलांसाठी ही बाब अधिक लागू होते.
आरोग्य आणि आयुर्मान
जैविकदृष्ट्या विचार करता महिला आणि पुरुष हे मूलभूतपणे वेगवेगळे आहेत, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की, त्यांना लागणाऱ्या आरोग्यसेवा आणि वैद्यकीय गरजांमध्येही फरक आहे.
विविध अभ्यासाअंती असे समोर आले आहे की, काही प्रकारच्या कर्करोगांबाबत महिलांचे आरोग्य अधिक संवेदनशील आहे आणि संधिवात किंवा ऑस्टिओपोरॉसिससारख्या तीव्र समस्या उद्भवण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आहे.