नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमध्ये भारतीय जवान हुतात्मा झाल्याप्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी (दि. 15 जून) रात्री व मंगळवारी (दि. 16 जून) भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. विनाशस्त्र असणाऱ्या सैनिकांना गलवान खोऱ्यात कोणी पाठवले? याला जबाबदार कोण?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
चीनने गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांना मारण्याचे धाडस कसे केले? भारतीय सैनिकांना मारून चीनने अपराध केला आहे. या सैनिकांना विनाशस्त्र गलवान येथे पाठवण्यात आले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे सरकारला विचारला आहे.
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी राहुल गांधी यांनी धारेवर धरले होते. पंतप्रधान मोदी गप्प का..? लपत का आहात..? बास.. आता खूप झाल! देशात जनतेला उत्तर द्या, नेमक काय झालं लडाखच्या सीमेवर?, चीनने आपल्या भारतीय सैन्यातील जवानांना मारलेच कसे? चीनची हिंमतच कशी होते, भारतीय सीमेत घुसखोरी करुन कब्जा करण्याची?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करुन विचारले आहेत.