श्रीनगर -लडाखमधीलभारत आणि चीन सीमारेषेवर तणाव असताना एका जागेचा उल्लेख सतत व्हायला लागला आहे. ती जागा म्हणजे गलवान खोरे आणि त्याच्याशी असलेला काश्मीरचा संबंध.
भारत-चीन सीमेवरचा तणाव कसा वाढत आहे, तो कसा निवळेल, दोन देशांच्या लष्कराचे संबंध कसे आहेत, याबद्दल तज्ज्ञ चर्चा करत आहेत. पण गलवान हे काश्मिरी नाव लडाखला कसे पडले आणि जगभरात ते कसे केंद्रबिंदू बनले, याचाच विचार काश्मीरमधले सर्वसामान्यकरत आहेत.
भारत-चीन सीमेजवळचे हे गलवान खोरे. तिथे गलवान नावाचा झरा हिमालयातून वाहतो. अक्साई चीन आणि पूर्व लडाख इथून काराकोरम पर्वतरांगांमधून गलवान नदी ८० किलोमीटर वाहत सिंधू नदीची उपनदी असलेल्या श्योक नदीला मिळते. हा प्रदेश रणनीतीसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि याच प्रदेशामुळे भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यानही हे खोरे केंद्रस्थानी होते.
या प्रदेशाला काश्मीर प्रांतातले गुलाम रसुल शहा ऊर्फ गलवान आणि त्यांचे पूर्वज कारारा गलवान यांचे नाव देण्यात आले. गलवान काश्मीरच्या डोग्रा राजवटीच्या अत्याचाराला घाबरून काश्मीरमधून पळून बाल्टिस्तान येथे स्थायिक झाले होते.
'ईटीव्ही भारत'ने गलवान प्रदेशाचा इतिहास आणि त्याच्या नावाबद्दल जाणून घेण्यासाठी गलवान वंशजांसोबत बातचीत केली. गुलाम रसूल गलवानचे नातू मोहम्मद अमिन म्हणाले, 'डोग्रा राजवटीत कारा गलवान आपल्या सुरक्षेसाठी पळाले आणि बल्टिस्तानला येऊन राहिले.'
'गुलाम रसूल यांचा जन्म लेह इथे १८७८ साली झाला. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी लडाखच्या भूभागावर आणि कोराकाराम ते मध्य आशियामार्गे ब्रिटिश पर्यटकांना आणि मोहीम करणाऱ्यांना गाईड बनून मार्गदर्शन करण्यास सुरवात केली, अशी माहिती अमिन यांनी दिली.