रायपूर - सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला गणेशाच्या अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे परशुराम आणि गणपती यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धामध्ये गणेशाचा एक दात तुटला होता. तेव्हापासूनच गजाननाला एकदंत म्हटले जाते.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात गणपतीचे हे विशेष मंदिर ढोलकाल टेकडीवर आहे. येथे 2 हजार 500 फूट उंचीवर गणेशाची मूर्ती स्थापित आहे.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात गणपतीचे विशेष मंदिर... पौराणिक मान्यतांनुसार, एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी नंदीराज पर्वतावर आले होते. तेव्हा गणेश पर्वतावर पहारेदारी करत होते. जेव्हा गणेशानं परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले. गणपती मागे हटत नसल्याने टेकडीच्या शिखरावर भगवान गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. या युद्धादरम्यान गणपती बाप्पाचा एक दात तुटला. त्यामुळेच गणेशाला 'एकदंत' हे नाव मिळाल्याचे म्हटलं जात.
या घटनेनंतर छिन्दक नागवंशी राजांनी टेकडीवर गणेशाची मूर्ती स्थापीत केली. परशुराम यांच्या कुऱहाडीने म्हणजे फरस्याने गणेशाचा एक दात तुटला होता. त्यामुळे टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावाचे नाव फरसपाल असे आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये फरसपाल गावात तीन दिवसांची यात्रा भरते.
दक्षिण बस्तरमधील भोगा अदिवासी कुटुंब आपली वंशाची उत्तप्ती ही गणेशाची पूजा करणाऱया एका महिला पूजाऱ्यापासून झाल्याचे मानतात. सर्वांत अगोदर भोगा जमातिच्या अदिवासी महिलेने गणेशाची पूजा केली होती. या महिलेचे वंशज आजही टेकडीवरील एकदंत गणेशाची पूजा करतात.
बैलाडिला पर्वतरांगातील हा सर्वात उंच शिखर आहे. मूर्तीच्या पोत आणि कोरीव कामातून असे दिसून येते की, 11 व्या शतकात ही उत्कृष्ट कलाकृती बनविली गेली होती. छत्तीसगडमधील सर्वात उंच शिखरावर असलेल्या गणेशमूर्तीपर्यंत पोहचण्यासाठी दुर्गम रस्ता आहे. आजूबाजूच्या गावातील लोक येथे पूजा करण्यासाठी येतात. ही जागा विकसित करण्याची गरज असून याकडे राज्य सरकार आणि पर्यटन विभागाने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मोठ्या संख्येने पर्यटक येथे पोहोचू शकतील.