नवी दिल्ली - हाथरसच्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असून पीडितेला न्याय देण्याची मागणी होत आहे. यातच भाजपा नेते रंजीत श्रीवास्तव यांनी हाथरस प्रकरणावरून मुक्ताफळे उधळली आहेत. पीडितेचे संबधित आरोपीसोबत प्रेम प्रकरण होते. त्याला भेटण्यासाठीच ती तिथे गेली असावी. तसेच बलात्कार प्रकरणातील मृत मुली या उसाच्या व मक्याच्या शेतातच का सापडतात?, त्या गव्हाच्या शेतात का सापडत नाहीत?, असे ते म्हणाले. तथापि, भाजपा नेत्याच्या अशा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुलीने प्रेमसंबंधांतूनच मुलाला बाजऱ्याच्या शेतात भेटण्यासाठी बोलावले असेल, तेव्हाच कोणीतरी त्यांना रंगेहात पकडले असेल. अशा बलात्कार प्रकरणात ज्या मुली मरतात. त्या अशा विशिष्ट ठिकाणीच सापडतात. या मुली उसाच्या, मक्याच्या शेतात किंवा जंगलात, गटारात आढळतात. या मुली गव्हाच्या शेतात का आढळत नाहीत? त्यांना फरफटत नेताना कोणी पाहत नाही, असे ते म्हणाले. तसेच सरकारने अशा प्रकरणातील मुलींना नुकसान भरपाई देऊ नये, अशी माझी सरकारकडे विनंती असल्याचे त्यांनी सांगितले.