नवी दिल्ली -गेल्या दोन महिन्यापासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच नाव समोर आले आहे. सध्या हे नाव देशपातळीवर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र परिचयाचे झालेले राकेश टिकैत कोण आहेत, याविषयी आपण जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर येथील जनपदच्या सिसौली गावात 4 जून 1969 साली राकेश यांचा जन्म झाला होता. राकेश यांनी मेरठ विद्यापीठातून एम.ए चे शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध शेतकरी नेते महैंद्र सिंग टिकैत यांचे राकेश हे सुपत्र आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राकेश टिकैत यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. यासाठी त्यांना तब्बल 44 वेळा तुरुंगवासही भोगावा लागलेला आहे. संसद भवनाबाहेर ऊस जाळून आंदोलन केल्यामुळे राकेश यांना तिहार तुरुगांत शिक्षासुद्धा भोगावी लागलेली आहे.
दिल्ली पोलिसांची नोकरी सोडली होती -
राकेश टिकैत हे एकेकाळी दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते. 1992 साली राकेश दिल्ली पोलिसांत सब-इन्स्पेक्टर म्हणून रूजू झाले होते. यादरम्यान एक घटना घडली ज्यामुळे राकेश यांनी ती नोकरी सोडून दिली. राकेश यांच्यावर वडील महेंद्र सिंग टिकैत यांचा खूप प्रभाव होता. त्यामुळेच 1993-94 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर वडील महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं.
हे आंदोलन संपवण्यासाठी राकेश यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तसंच तुमच्या वडील आणि भावांना आंदोलन संपवायला सांगा, असंही राकेश यांना सांगण्यात आलं आणि येथूनच राकेश यांच्या विद्रोहाला सुरुवात झाली. त्यांनी तडकाफडकी नोकरीला लाथ मारली. तेव्हापासून राकेश टिकैत शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहिले ते कायमसाठीच. यानंतर वडील महेंद्र सिंग टिकैत यांचा कर्करोगानं मृत्यू झाला आणि राकेश यांनी भारतीय किसान युनियनची धुरा सांभाळली.
शेतकरी आंदोलनाव्यतिरिक्त राकेश यांनी निवडणूकही लढवलेली आहे. राकेश टिकैत यांनी 2007 सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुजफ्फरनगरच्या खतौली मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर 2014 साली राकेश यांनी आरएलडी पक्षाकडून अमरोहा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही लढवली. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये राकेश यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या भावनात्मक आवाहनानंतर शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत. हे सर्व आंदोलन बांधून ठेवण्यात राकेश टिकैत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करेल, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला. आता केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यातील हा संघर्ष कुठपर्यंत जातो, हे पाहणं आता महत्त्वाच ठरणार आहे.