नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे जागतिक आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर एचआयव्ही रुग्णांवरील उपचार आणि एड्स प्रतिबंध कार्यक्रमांना खिळ बसली असून जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण पूर्व आशिया खंडांतील देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. एचआयव्ही रुग्णांच्या चाचण्या आणि उपचाराची यंत्रणा मंद गतीने कार्यरत असून त्यामुळे रुग्णांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा सावधानतेचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. एचआयव्हीसह अनेक देशांत पोलीओ लसीकरण कार्यक्रमही खोळंबून पडला आहे.
आशियासाठी धोक्याची घंटा
कोरोना महामारीचा जगात फैलाव झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक प्रगत देशांतील आरोग्य सुविधा कोलमडून पडली आहे. त्यामुळे एड्स बाधित रुग्णांची चाचणी, उपचार आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा मंदावल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. अनेक देशांतीत जनता एड्सच्या संकटात लोटली गेली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया विभागाच्या क्षेत्रीय संचालिका डॉ. पुनम खेत्रपाल यांनी हा इशारा दिला आहे. आशिया खंडातील देशांच्या आरोग्य यंत्रणांसाठी ही धोक्याची घंटा असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.