वाशिंग्टन - सोमवारी वाशिंग्टन शहरात जोरदार पाऊस झाला. जवळपास १ तास पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, याचा फटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील बसला आहे. व्हाईट हाऊसमध्ये चक्क पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्यात काम करण्याची वेळ आली होती.
पावसाचा फटका डोनाल्ड ट्रम्पना; जोरदार पावसानंतर व्हाईट हाऊसमध्ये शिरले पाणी - अर्लींग्टन
वाशिंग्टन परिसरात सोमवार सकाळी ९ ते १० या कालावधीत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. याआधी सर्वात जास्त पाऊस १९५८ साली नोंदवण्यात आला होता. त्यावेळी ५६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती.
व्हाईट हाऊसमध्ये शिरलेले पाणी काढण्यासाठी कर्मचारी आणि अग्निशामक दलाची पथके कामाला लागली आहेत. वाशिंग्टन परिसरात सोमवार सकाळी ९ ते १० या कालावधीत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. याआधी सर्वात जास्त पाऊस १९५८ साली नोंदवण्यात आला होता. त्यावेळी ५६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. परंतु, सोमवारी झालेल्या पावसाने हा विक्रम मोडीत काढला आहे. हवामान खात्याने भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेच्या उत्तर भागातील अर्लींग्टन आणि व्हर्जिनिया भागात वाशिंग्टनपेक्षा जास्त पावसाची नोंदणी करण्यात आली. या भागात १ तासात १२७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जोरदार पावसामुळे वाशिंग्टनसह अमेरिकेतील इतर भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वाशिंग्टनमध्ये झालेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मेट्रो स्थानकावरील पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. तर, शहरातील स्मारके आणि म्युझिअम बंद करण्यात आली आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने कारमध्ये अनेक नागरिक अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावाचे कार्य सुरू आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.