जयपूर (राजस्थान) - राज्यातील राजकीय गोंधळाच्या परिस्थितीवर काँग्रेसने आज (सोमवारी) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाने व्हीप काढला आहे. तसेच जे या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाचे नेते अविनाश पांडे यांनी सांगितले आहे. तर 109 आमदारांनी पक्षाला समर्थन असल्याचे पत्र दिले आहे.
राजस्थानमधील राजकीय गोंधळ; बैठकीसाठी काँग्रेसकडून 'व्हीप' जारी
राज्यातील राजकीय गोंधळाच्या परिस्थितीवर काँग्रेसने आज (सोमवारी) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाने व्हीप काढला आहे.
राजस्थानमधील प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट सोमवारी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. तसेच त्यांनी गेहलोत सरकार अल्पमतात आहे, असा दावा केल्यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष आणखीनच पेटला आहे. तर याच कारणामुळे रविवार-सोमवारी रात्री जवळपास 2 वाजून 15 मिनिटांनी राजस्थानचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांनी संयुक्तरित्या मुख्यमंत्री निवासस्थानावर पत्रकार परिषद बोलाविली. यादरम्यान, अविनाश पांडे म्हणाले, सोमवारी सकाळी साडेदहा वाजता कांग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. तसेच जर कोणी आमदार गैरहजर राहिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, काँग्रेस आणि अपक्ष मिळून एकूण 109 आमदारांनी पक्षाला आपले समर्थन दिले आहे.
राज्य सरकार कोरोनाच्या या महासंकटावर मात करण्यासाठी चांगल्याप्रकारे काम करत आहे. मात्र, भाजपा राज्य सरकारला अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.