देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना, मागील काही दिवसांपासून तबलीक हा शब्द आपल्या कानी अनेकदा पडत असेल. कारण गेल्या महिन्यात मार्चमध्ये, दिल्लीच्या निजामुद्दीन मर्कजमधील कार्यक्रमात ४ हजारहून अधिक तबलिकी लोक सामील झाले होते. या कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली. काय आहे तबलीकचा इतिहास वाचा समर खडस यांच्या लेखनीतून...
तबलीग जमात हा शब्द मी साधारणतः पंचवीसेक वर्षांपूर्वी ऐकला असेन. आमच्या कोकणातील गावात मोहर्रमला ताजीया काढून त्याच्या भोवती फेर धरून नाचतात. रोठ आणि मलिदा करतात व दिवाळीतील फराळासारखा नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना वाटतात, नगारा-ताशा वाजवतात. या सगळ्याला गावातील संख्येने मोजक्याच असलेल्या काही तबलीगींनी विरोध केला होता. इस्लाममध्ये या गोष्टी हराम असल्याचं ते सांगत होते. त्याचे लिखित दाखले देत होते. याला गावातील काही ज्येष्ठांनी विरोध केला. ही आपल्या वाडवडलांची प्रथा परंपरा आहे, असं या ज्येष्ठांचं म्हणणं होतं. तेव्हा या जमाती लोकांचं फारसं काही चाललं नाही. मात्र कालांतराने तबलीगचं वर्चस्व वाढत गेलं.
एकतर मुस्लिम समाजातील अनेक तरुण नोकरी निमित्ताने खाडी देशांमध्ये जाऊ लागले. तिथला सांस्कृतिक वर्चस्ववाद त्यांच्या नेणिवेत हळू-हळू रूजायला सुरुवात झाली. भारतीय मुसलमानांच्या परंपरा कशा अयोग्य आहेत, याचे तर्क त्यांना सांगितले जाऊ लागले व ते हळू-हळू त्यांच्या गळी उतरू लागले. इथले ज्येष्ठ वयानुसार जगातून वजा व्हायला लागले व उरलेल्यांचे काही चालेनासेही झाले.
पुढे इस्लामवर पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने अनेक पुस्तके वाचावी लागली. त्यात तबलीगचे संदर्भ अनेक ठिकाणी आले. विशेषतः माहमूद मामदानी आणि रेझा असलान यांनी यावर प्रकाश टाकला आहे. जॉन कूली हे विविध इस्लामी गट, त्यांच्या चळवळी, त्यांच्यातील आंतरविरोध आदींचे अभ्यासक आहेत. त्यांचं एक २००० साली प्रकाशित झालेलं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. 'अनहोली वॉर' त्यात त्यांनी या तबलीग जमातविषयी विस्तृत लिहिलं आहे.
कूली हे अमेरिकी भांडवली विचारांचे असल्याचे, दाखले काहीजण देऊ शकतील कदाचित, पण माहमूद मामदानी किंवा रेझा अस्लान यांच्या विषयी ते देता येणं कठीण आहे. त्यात मामदानी हे तर डाव्या विचारांचे अमेरिकास्थित मुसलमान आहेत. त्यांच्या विषयी मुस्लीम कट्टरपंथीयांचा राग हा वेगळ्या प्रकारचा असू शकेल.
या सगळ्यातून जी माहिती मिळते ती अशी की, मौलाना मुहंमद इलियास यांनी दिल्लीपासून जवळच असलेल्या मेवात या ठिकाणी या तबलीग जमातची स्थापना १९२६ साली केली. उत्तर प्रदेशातील देवबंदच्या दारूल उलमच्या धर्तीवर आणि विचारधारेवरच काम करणारी ही संघटना. मुसलमान हे आपल्या मुख्य विचारांपासून दूर जात आहेत. इस्लामी परंपरांना फाटा देत आहेत. त्यांना खऱ्या इस्लामी परंपरा शिकवल्यासच जगात खऱ्या अर्थाने खुशाली येईल वगैरे प्रकारचा हा मूळ विचार होता. आता या मूळ परंपरा म्हणजे यांच्या दृष्टीने अरबी परंपरा हे सांगायला नकोच.
वास्तवात स्वतः पैगंबरांनी याबाबतची कट्टरता फारशी दाखवल्याचं कुठेही इतिहासात नमूद नाही. दुसरी गोष्ट पैगंबरांच्या पश्चात जेव्हा इस्लाम विविध सांस्कृतिक पट्ट्यांमध्ये पसरायला लागला. कारण त्या काळात राष्ट्र किंवा देश ही संकल्पना जन्माला आलेली नव्हती. तेव्हाही पहिल्या चार खलिफांपैकी कुणीही त्या नव्या प्रदेशांतील संस्कृतींशी द्रोह केल्याचेही दिसत नाही. उदाहरणार्थ पर्शिया जिंकल्यानंतर तिथल्या अनेक रूढी, चालीरिती तशाच सुरू ठेवण्यात आल्या, काही कर वसुलीसारख्या नव्या गोष्टी अरबांनी शिकून घेतल्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील, असो.
तर दक्षिण आशियातील मुसलमानांना शुद्ध इस्लामी चालीरिती शिकवण्याच्या हेतूने या संघटनेची सुरुवात झाली. शुद्ध हा शब्दच खरंतर फार प्रतिगामी वाटावा असाच आहे. शुद्ध शाकाहारी, शुद्ध भाषा. त्यात शुद्ध धर्म आला की विचारायलाच नको. मग यांनी मुसलमानांना सुफी परंपरा कशा चुकीच्या आहेत. पिराच्या कबरीसमोर काही मागणे कसे चूक आहे, त्याच्या समोर माथा टेकणे कसे चूक आहे, याचे धडे द्यायला सुरुवात केली.
भारतीय परंपरेला साजेशी येथील सुफी परंपरा होती. लोक देवळात मूर्तीसमोर हात जोडत होते, तेच दर्ग्यात येऊन पिराच्या समोर हात फैलावत होते. याला विरोध करायला सुरुवात झाली. ती इतक्या खालच्या पातळीवर गेली की आठ-दहा वर्षांपूर्वी मुंबईतील एका जमाती मौलानाने ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांना आपल्या भाषणात शिवागाळ केली होती. त्यातून सुफी परंपरा मानणारे आणि जमाती यांच्यात काही ठिकाणी छोटे दंगेही उसळले होते. पुढे पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं.
कूली आणि मामदानी यांच्या म्हणण्याप्रमाणे तबलीगचे मुख्यालय हे पाकिस्तान इथे आहे. तबलीग स्वतःला अराजकीय संघटना अभिमानाने म्हणवून घेत असते. आम्ही केवळ धर्माचे पालन कसे करावे, इस्लामी परंपरा, दररोजच्या जीवनात कसे राहावे, कसे वागावे, कसे खावे, कसे बसावे (अगदी शौचासदेखील) या बाबीच मुस्लिमांना शिकवतो, असे ते सांगतात.
मात्र अफगाणिस्तानातील कम्युनिस्ट सरकार पाडण्यासाठी अमेरिकेने आणि पाकिस्तानने जे प्रयत्न केले त्यातही तबलीगची त्यांना मोठी मदत झाली. सोविएत युनियनने अफगाणिस्तानात लाल सेना पाठवली होती, त्याला विरोध करण्यासाठी या तबलीग जमातमधूनच मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आल्याचे दाखले कूली आणि मामदानी यांनी दिले आहेत.
१९८८ साली लाहौर येथे जगभरातील ९० पेक्षा अधिक देशांतून दहा लाखांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांचा त्यांनी मेळावा घेतला व जगभरातील अनेकांचे त्यांच्याकडे पहिल्यांदा लक्ष गेले होते.