सिव्हीअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) सदृश आजारांमधील नवीन दुवा,अर्थात् नव्या कोरोना विषाणूमुळे होणारा आजार सर्वप्रथम 2019 मध्ये वुहान,चीन येथे आढळून आला. याला कोविड (COVID) -19 असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये 'CO'म्हणजे कोरोना, 'VI'म्हणजे व्हायरस (विषाणू) आणि 'D'म्हणजे डिसीझ (आजार).
- या आजाराची श्वास न पुरणे,खोकला,ताप इत्यादी लक्षणे आढळून येतात. अधिक तीव्र प्रकरणांमध्ये,संसर्गामुळे न्युमोनिया किंवा श्वसनासंबंधी अडचणी उद्भवतात. क्वचितवेळा,हा आजार जीवघेणा ठरु शकतो.
- कोविड-19 विषाणूने ग्रस्त बहुतांश लोकांमध्ये सौम्य ते तीव्र प्रमाणात श्वसनाचे आजार आढळून येतात आणि कोणतेही विशेष उपचार न घेता त्यातून ते बरे होऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक आणि ह्रदयाशी संबंधित आजार,मधुमेह,गंभीर श्वसन आजार आणि कर्करोगासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना गंभीर स्वरुपाचा आजार होण्याची शक्यता आहे. परिणामी,या असुरक्षित समुदायांचे रक्षण करुन प्रसार थांबविण्यास सर्वात गंभीर प्राधान्य आहे.
- कोविड-19 हा प्रामुख्याने लाळेचे थेंब किंवा जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते किंवा खोकते त्यावेळी नाकातून बाहेर पडणाऱ्या द्रव्यातून पसरतो. यामुळे,श्वसनासंबंधीच्या महत्त्वपुर्ण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ,खोकताना आपल्या हाताचा कोपरापासून दुमडलेला भाग समोर ठेवावा). विषाणूमुळे दुषित झालेल्या पृष्ठभागांना स्पर्श केला आणि त्यानंतर आपला चेहरा,नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केला तरीही विषाणूचे संक्रमण होऊ शकते. कोविड-19 हा एखाद्या पृष्ठभागावर काही तासांसाठी जिवंत राहू शकतो,मात्र साध्या जंतुनाशकामुळे हा विषाणू नष्ट होतो.
- कोविड-19 चा आजार निर्माण करणारा विषाणू अतिशय प्रभावीपणे लपू शकतो,वेगाने पसरतो आणि बहुतांश भौगोलिक प्रदेशांमधील समुदायांमध्ये टिकून राहतो.या विषाणूचे अस्तित्व जठर व आतड्यांशी संबंधित यंत्रणेत आढळून येते आणि याशिवाय हा विषाणू विष्ठेतून उत्सर्जित होतो. परंतु संक्रमणाचा आणखी एक संभाव्य मार्ग म्हणून फेको-ओरल मार्गावरुन होणारे संक्रमण सिद्ध होण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. ज्या मातांना संसर्ग असल्याचे सिद्ध झाले आहे,किंवा होईल असा संशय आहे,त्यांना आपल्या नवजात बालकापासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे,अशी शिफारस सीडीसीकडून करण्यात येत आहे. या विलगीकरणामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे,एखादी व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे आढळून येण्यापुर्वीच विषाणूचा प्रसार करु शकतो. विषाणूच्या संपर्कात आल्यानंर लक्षणे दिसून येण्यासाठी 2 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो.
- योग्य आणि नियमितरित्या साबण व पाण्याने हात धुण्याने तसेच बाधित व्यक्ती आणि स्वतःमध्ये किमान 1 मीटरचे (3 फूट) अंतर राखल्यास संक्रमण रोखता येऊ शकते. त्याचप्रमाणे श्वसनासंबंधी नियमांचे पालन म्हणजेच शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाकावर कोपऱ्यातून दुमडलेला हात किंवा टिश्यूचा वापर करणे आणि वापरलेल्या टिश्यूची ताबडतोब विल्हेवाट लावणे. डोळे,नाक आणि तोंडाला होणारा स्पर्श टाळणे आवश्यक आहे कारण हातावाटे विषाणू एखाद्याच्या शरीरात प्रवेश करु शकतो.
भारतासाठी धडा...
उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रणाली असणारा इटली हा देश सधन मानण्यात येत असला तरीही,तेथे मोठ्या प्रमाणात संसर्ग आणि मृत्यू झाले आहेत. विविध इटालियन प्रांतांमध्ये विविध प्रकरणे आणि मृत्यूंची संख्या वेगवेगळी होती. ज्या प्रांतामध्ये अधिक चाचण्या करण्यात आल्या तेथील रुग्णालये बाधित रुग्णांनी ओसंडून वाहणार नाहीत याची खात्री करण्यात आली. लोकांना घरात राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. परिणामी,रुग्णालये ही संसर्गाचे केंद्र बनली नाहीत आणि केवळ गंभीर परिस्थितीतील रुग्णांवर उपचार शक्य झाले.आतापर्यंत दक्षिण कोरियाने प्राप्त केलेले यश हे केवळ सरकारमुळे नाही,यामध्ये लोकांचादेखील सहभाग तितकाच महत्त्वपुर्ण आहे. देशाने दिवसाला 20,000 लोकांची चाचणी केली आणि सहा तासांमध्ये निकालही सादर केले. दक्षिण कोरिआत नव्याने बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे. याचे श्रेय सरकारला देण्यात आले आहे आणि नागरिकांनी केलेल्या "स्वयंप्रेरित सहकार्यामुळे सरकारला कडक उपाय राबविण्यात यश आले. सरकार चाचण्या करीत आहे,ट्रॅकिंग करीत आहे,लोकांचा शोध घेत आणि त्यांच्यावर उपचार करीत आहे. समाजापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी सरकारने जलद उपाययोजना केल्या. त्याचप्रमाणे,मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेल्या लोकसहकार्यामुळे सरकारला प्रभावी कृती करण्यात यश आले आहे.
संपुर्ण देशात लॉकडाऊन लागू करत भारत सरकारने उत्कृष्ट पाऊल उचलले,मात्र त्याच्या अंमलबजावणीचा घोळ झाला. शहरांमधील स्थलांतरित आपल्या गावी पोहोचण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाबरोबर राहण्यासाठी कित्येक किलोमीटर्सचे अंतर चालून पार करत आहेत. ग्रामीण स्थलांतरितांनी घराची वाट धरल्याने,हा विषाणू ग्रामीण भागातदेखील पसरु शकतो. म्हणून,हे लोक जेथे असतील त्याठिकाणी स्क्रीनिंग सुविधेसह निवारा,अन्न आणि आर्थिक लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने त्वरित पावले उचलावीत.