नवी दिल्ली -गार्गी महाविद्यालयात झालेल्या विनयभंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रोमिला कुमार यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी काही मद्यधुंद व्यक्तींनी महाविद्यालयामध्ये शिरून, विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.
याबाबत दिल्ली महिला आयोगाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना समन्स पाठवले आहे. डॉ. कुमार यांना १३ फेब्रुवारी दुपारी २ पूर्वी महिला आयोगासमोर हजर राहून यावर उत्तर द्यावे लागणार आहे.
शनिवारी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थिनींनी अशी तक्रार केली होती, की महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी, मद्यधुंद अवस्थेत असणारे काही व्यक्ती महाविद्यालयात शिरले होते, आणि त्यांनी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली होती. हे व्यक्ती नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलनामधील व्यक्ती होते, असा आरोपही या विद्यार्थिनींनी केला होता.