नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव केला होता. तर आज पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून तृणमूल काँग्रेसने जोरदार वापसी केली आहे.
पश्चिम बंगालमधील कालियागंज, खरगपूर सदर आणि करीमपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडली होती. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. खरगपूर सदर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र येथे तृणमूल काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर खरगपूर मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे प्रदीप सरकार यांनी भाजपचे प्रेमचंद्र झा यांचा पराभव केला आहे. तर कालियागंज पोटनिवडणुकीत तृणमूलचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी चंद्र सरकार यांचा पराभव केला. याचबरोबर करीमपूर मतदारसंघामध्ये तृणमूलच्या बिमलेंदु रॉय सिन्हा यांनी भाजपचे जयप्रकाश मजूमदार यांचा पराभव केला आहे.
सत्तेबाबत भाजपमध्ये असलेल्या अहंकाराला मतदारांनी उत्तर दिले आहे. हा विजय आम्ही पश्चिम बंगालच्या लोकांना समर्पित करते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या या पोटनिवडणुकांचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.