कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विवादीत सर्क्युलर मागे घेतले आहे. ममता म्हणाल्या, विवादीत सर्क्युलर खुप जुने आहे. एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे सर्क्युलर प्रसारित करण्यात आले होते.
विवादीत सर्क्युलरनुसार, मुस्लिम बहुसंख्य शाळांमध्ये वेगळा डायनिंग हॉल करण्याचे सांगण्यात आले होते. राज्य सरकारच्या या सर्क्युलरला विरोध सुरू झाला होता. परंतु, सरकारने याचा बचाव करताना सांगितले होते, की सर्क्युलरनुसार, ज्या शाळांमध्ये ७० टक्के विद्यार्थी अल्पसंख्यांक आहेत, अशा शाळांमध्ये वेगळ्या डायनिंग हॉल करण्यात येणार होता. यासाठी अल्पसंख्यांक विभागाकडून निधी पुरवण्यात येणार होता. मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत डायनिंग हॉल बनवण्यात येणार होता.
मुख्यमंत्री ममता यावर बोलताना म्हणाल्या, ज्या शाळांमध्ये डायनिंग हॉल नाही, अशा शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. ही योजना फक्त अल्पसंख्यांकासाठी नसून सर्वांसाठी बनवण्यात आली आहे. ज्याठिकाणी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी अल्पसंख्याक विभागाचा निधी वापरुन डायनिंग हॉल बनवण्याची कल्पना होती. हा सर्क्युलरचा मुळ उद्देश होता. योजना प्रभावीपणे लागू करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून या योजनेसाठी निधी गोळा करण्याचा मुख्य हेतू यामागे होता. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये फुट पाडण्याचा काही प्रश्नच येत नाही. तांत्रिक चुकीमुळे याचा वेगळा अर्थ लावण्यात आला होता. यामध्ये विवादीत असे काहीच नव्हते.
ममतांच्या या निर्णयावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता जीव्हीएल नरसिम्हा राव म्हणाले, ममता अल्पसंख्यांक समुदायाला खूष करण्याचे राजकारण खेळत आहेत. तर, पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, ममतांनी राजकारणासाठी ही खेळी केली आहे.