बडोदा (गुजरात)-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बडोदा महापालिकेने बंधनकारक केले आहे. मास्क न घालणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. पहिल्यावेळी 1 हजार तर नंतर प्रत्येकवेळी 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे मास्क उपलब्ध नसेल त्यांनी रुमाल किंवा कापड चेहऱ्यावर बांधावा, असे आवाहन बडोदा महापालिकेचे उपायुक्त सुधीर पटेल यांनी केले.
मास्क न घालता किंवा रुमाल चेहऱ्यावर न बांधता कोणताही नागरिक सापडल्यास त्यांना पहिल्यावेळी 1 हजार आणि नंतर प्रत्येकवेळेस 5 हजार रुपये दंड भरावा लागेल, असे पटेल म्हणाले. या नियामाची अंमलबाजवणी होते का नाही हे पाहण्यासाठी भरारी पथके बनवण्यात आली आहेत. बडोदा महापालिकेत 12 वार्ड आहेत. प्रत्येक वार्डमध्ये 3 पथके कार्यरत राहतील, अशी माहिती पटेल यांनी दिली.
मुंबई, पुणे, राजस्थान, छत्तीसगड, गुरुग्राम, अहमदाबाद, दिल्ली, चंदीगड आणि ओडिशा येथे घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 650 वर पोहोचली आहे तर 59 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात 11439 जणांची कोरोनाबाधित म्हणून नोंद झाली तर 1305 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 377 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.