महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळ अभिमानाने जगाला सांगत आहे; "आपण ही लढाई जिंकूच!"..

३४ कोटींची लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये ३० जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सामुदायिक संपर्कातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार होईल असे मानले गेले. मात्र केरळ सरकारने आवश्यक ती सावधगिरी बाळगून अतिशय प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यामुळे कोरोना आटोक्यात राहिला आहे. राज्यात आतापर्यंत फक्त ३ रुग्ण दगावले असून २६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत..

'We shall overcome': Kerala proudly announces to the world
केरळ अभिमानाने जगाला सांगत आहे; "आपण ही लढाई जिंकूच!"..

By

Published : Apr 14, 2020, 5:01 PM IST

'कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक स्वतः आपले अन्न बनवू शकत नाहीत/तयार करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सामुदायिक स्वयंपाकघरात भोजन तयार करुन ते घरोघरी पोचविले जाईल, कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल', या शब्दात केरळच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार अत्यंत खंबीरपणे आणि आवश्यक ती सावधगिरी बाळगत जनतेच्या पाठीशी असल्याचे सरकारने म्हटले आहे. तसेच सरकार सर्व सामर्थ्यानिशी प्राणघातक महामारीचा सामना करेल असे देखील सांगण्यात आले.

चीनमधील वुहान प्रांतातून उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या प्राणघातक संसर्गाने संपूर्ण जग जायबंदी झाले आहे. चीननंतर इराण, इटली आणि स्पेन या देशांमध्ये हाहाकार माजवल्यानंतर अरब देशांच्या मार्गाने कोरोनाने भारतासहित इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये शिरकाव केला आहे. दरम्यान संपूर्ण जगावर दबदबा राखणाऱ्या ब्रिटन आणि अमेरिकेने कोरोनाच्या संकटाकडे दुलर्क्ष केले. मात्र लवकरच ब्रिटनच्या ही बाब लक्षात येऊन त्यांनी देखील कोरोनापुढे शरणागती पत्करली आहे.

३४ कोटींची लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये ३० जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सामुदायिक संपर्कातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार होईल असे मानले गेले. मात्र केरळ सरकारने आवश्यक ती सावधगिरी बाळगून अतिशय प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यामुळे कोरोना आटोक्यात राहिला आहे. राज्यात आतापर्यंत फक्त ३ रुग्ण दगावले असून २६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान केरळनंतर तब्बल १ महिन्यानंतर म्हणजे १ मार्च रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळून आला. मात्र ५ एप्रिलपर्यंत ही संख्या २,७७,५२२ वर पोचली. तर ३२१८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. विशेष म्हणजे न्यूयॉर्क शहराची लोकसंख्या केरळ राज्याच्या निम्म्यापेक्षा थोडीशी अधिक म्हणजे १.९४ कोटी इतकी आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू क्यूमो यांना संपूर्ण अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेला पाचारण करावे लागले. न्यूयॉर्क शहरानंतर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये न्यू जर्सीचा दुसरा क्रमांक लागतो. तर कॅलिफोर्निया, फ्लोरिडा आणि मिशिगनची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सादर केलेल्या अहवालानुसार, अमेरिकेत ३ एप्रिलला एकाच दिवसात १४८० व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. परिणामी, रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सामुदायिक दफनाचे काम सुरु होते. परिस्थिती इतकी बिघडली की कोरोनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्क शहरातील रुग्णालयात जागाच शिल्लक नव्हती. शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लष्कराला बोलाविण्याची भाषा करावी लागली.

बरोबर एक महिन्यापूर्वी कोरोनाने आपले रौद्र रूप धारण केलेले असताना आणि संपूर्ण जगाला विळखा घालायला सुरुवारत केलेली असताना देखील ट्रम्प यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. उलट प्रत्येक हंगामात उद्भवणाऱ्या एखाद्या तापाप्रमाणेच कोरोना असल्याचे सांगत अमेरिकेला चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले. दरम्यान पहिला रुग्ण आढळल्यानंतर देखील काही आठवडे उलटून गेले तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही. कोरोना संपर्काने फैलावत असून देखील रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवले गेले नाही किंवा त्यांचे घरातच विलगीकरण केले गेले नाही. परिणामी आज अमेरिका हतबल झाली आहे. नुकसान टाळण्यासाठी टेस्टिंग आणि व्हेंटिलेटर वाढविणे हाच कोरोनाविरुद्ध लढण्याचा मार्ग असल्याचे अमेरिका आता सांगत आहे. दरम्यान अमेरिकेत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन लाखांपर्यंत पोचेल असा अंदाज जागतिक संघटनेने व्यक्त केला आहे. तर कोरोनावरील सर्व नियंत्रण गमवून बसलेले इटली आणि स्पेन हे अमेरिकेच्या खालोखाल असतील.

महत्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच चीनसहित जगातील विविध भागात कोरोना प्रादुर्भावाचे स्वरूप लक्षात यायला सुरुवात झाल्यानंतर लगेचच केरळने जागरूकता दाखवत संकटाविरुद्ध लढण्यासाठी उपाययोजना आखल्या जेणेकरून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवता येईल. केरळने योजलेल्या उपायांची स्तुती करताना 'केरळने जो विचार आज केला आहे, तो भारताने उद्या केला पाहिजे किंवा अंमलात आणला पाहिजे' असे देशातील एका आघाडीच्या माध्यम समूहाने म्हटले आहे. दरम्यान उशिराने का असेना पण कोरोनाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तेलंगणा सरकारने केरळ मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी आपल्या राज्यातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांचा एक चमू केरळला पाठविला होता.

अचूक पप्रतिबंधात्मक उपाय आणि मार्गदर्शन, जगातील विविध भागातील आरोग्य तज्ञांशी सतत विचारविनिमय आणि चर्चा, परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न, या व्यक्तीने प्रवास केलेली ठिकाणे शोधून संपर्कात आलेल्यांची माहिती मिळविणे, संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळ्यास त्यांना संपूर्ण विलगीकरण करण्यास सांगणे, परिस्थितीचे आकलन आणि विश्लेषण करण्यासाठी सरकार आणि आरोग्य अधिकारी यांच्याशी नियमित बैठका घेणे आणि अत्यंत परिश्रमपूर्वक आवश्यक ती कार्यवाही करणे ही 'केरळ मॉडेल'ची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कोरोनाचा यशस्वीरीत्या सामना करण्यासाठी केरळ मॉडेल जगभरात अवलंबिले जात आहे.

दरम्यान मागील काही वर्षांपूर्वी आलेल्या 'निपाह' या आणखी एका जीवघेण्या साथीचा अनुभव पाठीशी असल्याने कोरोना उद्रेकाचा केरळला मुळीच धक्का बसला नाही. याउलट केरळच्या आरोग्य विभागाने स्वानुभवाच्या जोरावर अत्यंत तातडीने आवश्यक ती खबरदारी घेत कोरोनाला आटोक्यात ठेवले. २ मे ते १० जून २०१८ दरम्यान आलेल्या 'निपाह'च्या जीवघेण्या विषाणूला देखील केरळच्या आरोग्य विभागाने अत्यंत प्रभावी, पद्धतशीर आणि सुनियोजित प्रयत्नांमुळे आटोक्यात आणले होते.

निपाह विषाणूला आटोक्यात ठेवण्यासाठी केरळच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या प्रयत्नांची देखील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली होती.

असे आहे केरळ मॉडेल..

  • पहिला कोरोना बाधित रुग्ण..

केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. हा रुग्ण म्हणजे चीनमधील वुहान प्रांतातून नुकतीच परत आलेली त्रिसूर जिल्ह्यातील एक विद्यार्थिनी होती. पुणे येथील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट आणि केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी या विद्यार्थिनीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य सरकारला अधिकृत कळविले. ही माहिती येताच केरळ आरोग्य विभाग नियोजनाप्रमाणे कामाला लागला. राज्य सरकारने अत्यंत तातडीने आरोग्याची खबरदारी घेण्यासंबंधी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासंदर्भात जाहीर केले.

दरम्यान वुहान प्रांतातून परतलेल्या २० जणांच्या टेस्टपैकी फक्त एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर अत्यंत तातडीने सूत्रे हालायला सुरुवात झाली, त्याच दिवशी केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा आणि आरोग्य विभागाचे सचिव राजन गोब्रागडे त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आणि एक उच्चस्तरीय बैठक घेतली. सरकारने तत्काळ राज्यातील सर्व जिल्ह्यांना सूचना दिल्या. याचदरम्यान चीनमधून सुमारे 200 केरळवासीय घरी परत येणार असल्याने विमानतळांवर या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली.

पहिल्याच दिवशी विशेष कोविड कंट्रोल रूम आणि हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले. यानंतर तब्बल 1036 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर 15 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

  • संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम..

कोरोनाचा पहिला रुग्ण पॉझिटिव्ह येताच युद्धपातळीवर त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये यंत्रणा राबविण्यात आली. अकाउंट विभागासाठीचा विभाग कोविड रुग्णांना स्वतंत्ररित्या विलग/ आयसोलेट करण्यासाठी बनविला गेला. या विभागातील वीस खोल्या स्वतंत्ररित्या तयार करण्यात आल्या. अत्यंत अल्पावधीतच एकाचवेळी 24 जणांना स्वतंत्र ठेवण्यास , निरीक्षण करण्यास आणि उपचार करण्यची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आली.

दरम्यान विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह येताच पुढच्या ५ तासात आयसोलेशन वॉर्ड / विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आणि त्या विद्यार्थनीला त्या ठिकाणी हलविण्यात आले. या विद्यार्थिनींबरोबर गेलेल्या आणखी पाच विद्यार्थ्यांना त्याच हॉस्पिटलमध्ये साध्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले.

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यात यश मिळविण्यासाठी कोणता एका महत्वाचा घटक असेल तर तो म्हणजे, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याची केरळ मॉडेलची अत्यंत प्रभावी पद्धत. अन्य कोणत्याही राज्यांनी याविषयीचा साधा विचारही केला नसेल किंवा धोरणही आखले नसेल त्यावेळी केरळमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.

संपर्कग्रस्तांना शोधून काढण्याचे दिव्य यशस्वीपणे पार पडताना पुढील गोष्टी करण्यात आल्या. जो कुणी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येईल, तो मागील काही दिवसात ज्या ज्या ठिकाणी गेला असेल जसे की, दुकाने, हॉटेल्स, मित्र, नातेवाईक, प्रवासाची ठिकाणे, इतर सार्वजनिक ठिकाणे तसेच स्थानिक जागा यांची आरोग्य विभागातर्फे यादी बनविण्यात येई. यासाठी विविध विभागांशी समन्वय राखण्यात येत. संबंधित जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधीक्षक मिळून ही शोधमोहीम राबवत. यानंतर ही यादी किंवा एकंदर प्रवास सार्वजनिक करण्यात येई.

रुग्णाचा प्रवास सार्वजनिक केल्यानंतर जर कुणी व्यक्ती त्या रुग्णाच्या संपर्कात आली असेल तर तिने / त्याने तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात येत असे. अशा व्यक्तींनी संकोच न करता आरोग्य विभागाशी संपर्क करावा म्हणून स्वतःच्या कुटुंबाबरोबरच समाजाच्या भल्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत असे.

जे अगोदरपासूनच रुग्णालयात आहेत अशा व्यक्तींना तसेच रुग्णालय कर्मचाऱ्यांना / स्टाफला मास्क घालण्यासंदर्भात वारंवार लाऊड स्पीकरच्या माध्यमातून घोषणा करून सूचना देण्यात येत असत.

दरम्यान चीनला नुकतेच भेट देऊन आलेल्या सर्व व्यक्तींना सरकारी रुग्णालये किंवा आरोग्य विभागाला संपर्क करण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांच्या वतीने देण्यात आल्या. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या किंवा नसलेल्या सर्वांचा समावेश होता. तसेच जे कुणी या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तंबी दिली.

जे लोक रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत आहेत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही काटेकोरपणे घरी स्वयं-विलगीकरणाचे पालन करण्यास सांगितले गेले. कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना आणि मेळाव्यांना उपस्थित न राहण्याचे, नातेवाईक किंवा शेजार्‍यांना न भेटण्यासंदर्भात सांगण्यात आले. या व्यक्तींना पूर्वनियोजित विवाहसोहळे किंवा इतर समारंभ पुढे ढकलण्याची मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली. शासनाच्या या निर्णयामुळे सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत झाली.

  • साखळी खंडित करा (ब्रेक द चेन)..

अलापुझा आणि कन्हानगढ भागात आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळताच सरकारने कोविड १९ ला राज्यस्तरीय आपत्ती जाहीर केले. याप्रकारे आरोग्याच्या कारणास्तव आपत्ती जाहीर करण्याची केरळची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान कोरोनाचे पहिले तीनही रुग्ण वुहानवरून एकाच विमानाने प्रवास करून आले होते.

यानंतर सर्व शासकीय यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली. दिवस रात्र यावर काम सुरु झाले. कोविड १९ च्या संक्रमणाला रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन/ साखळी खंडित करा' अभियानाला सुरुवात झाली. हाताच्या स्वच्छतेचे महत्व केरळमधील गल्लीबोळात पोचविण्यात आले. हात धुण्याची योग्य पद्धत यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, फलक, होर्डिंग्ज लावून तसेच वृत्तपत्रांमधील जाहिरातीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांनी सरकारच्या 'ब्रेक द चेन' अभियानात भाग घेऊन हाताची स्वछता राखून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी जागृती निर्माण केली. रस्त्यांवर, सरकारी कार्यालयीन ठिकाणी, लोक एकत्र येण्याच्या सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी मुबलक पाणी आणि साबण पुरविण्यात आले. अनेक ठिकाणी खाजगी कंपन्यांची मदत घेण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एकाच दिवसात ३०० डॉक्टर्स आणि हजारो नर्सेसची स्थायी स्वरूपात नियुक्ती करण्यात आली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले. ज्यांच्यामध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे आढळून आली अशाना सरकारी रुग्णालयात तर गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले. संशियितांचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठविण्यात येत. तसेच अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत या व्यक्तींना कोणाच्याही संपर्कात येऊ दिले जात नसे.

  • जनजागृती मोहीम..

कोरोना प्रसाराची जनजागृती करण्यात केरळ सरकार यशस्वी ठरले. कोरोनाचे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कसे होते, संक्रमण रोखण्यासाठी शाररिक अंतर राखणे आणि स्वछता ठेवणे कसे गरजेचे आहे हे सांगण्यात सरकार यशस्वी ठरले. परिणामी कोरोना महामारीपासून जनतेला दूर ठेवण्यात सरकारला यश आले आहे.

'सामाजिक ऐक्य आणि शारीरिक अंतर'..

केरळने जेव्हा ‘ सामाजिक ऐक्य आणि शारीरिक अंतर’ राखण्याचे आवाहन करीत ‘सामूहिक ऑरोमायम शेरेरिका अकल्याचायम’ची घोषणा दिली तेव्हा भारतातील इतर राज्यांनी यासंदर्भात विचार देखील केला नव्हता. जागरूकता मोहिम आणि शारीरिक अंतराच्या आवाहनातून आरोग्य विभाग आणि सरकार सुरुवातीपासूनच यशस्वी ठरले. कोरोनाचा शिरकाव प्रामुख्याने चीन तसेच इतर देशामधून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून होईल असे अपेक्षित धरून आरोग्य विभागाने आपली यंत्रणा कामाला लावली. परदेशातून प्रवास करून आलेली कोरोना वाहक संभावित व्यक्ती इतर नागरिकांच्या संपर्कात येणार नाही यासाठी कडक पाळत ठेवण्यात आली. राज्य सीमा आणि रेल्वे स्थानकांवर दक्षता वाढविण्यात आली; थर्मल स्क्रीनिंग आणि वाहन तपासणीचे उपाय राबविले गेले.

परदेशातून प्रवास केलेल्या सर्वांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे कडक आदेश देण्यात आले होते. त्यांना नातेवाईक आणि मित्रांना भेटायला देखील बंदी घातली होती. कोविडग्रस्त देशांमधून प्रवास केलेल्या व्यक्तींची यादी, त्यांचा संपूर्ण पत्ता आणि फोन नंबर आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना देण्यात आले. आरोग्य विभागाने विमानतळावर विशेष कोविड स्क्रिनिंग डेस्क सुरु केले. ताप आणि फ्लूची लक्षणे असलेल्यांना विलग करण्यात आले. कोविडग्रस्त देशांमधून केरळमध्ये प्रवास करणाऱ्यांची यादी तयार करण्यासाठी एक गूगल शीट तयार केली गेली.

कोविड प्रतिबंधक कामाच्या प्रत्येक बाबींचे मूल्यांकन करण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दररोज पुनरावलोकन बैठका घेत आहे. हे काम आजही चालू आहे. होम क्वारंटाईन असणार्‍यांची यादी, रुग्णालयांमधील विलगीकरण आणि निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्यांची यादी दररोज अद्ययावत केली जाते. होम क्वारंटाईन असलेल्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जवळच्या शासकीय आरोग्य विभागातील कर्मचारी घरी जाऊन माहिती घेतात. ग्रामीण, दुर्गम भागातील माहिती गोळा करण्यासाठी आशा कर्मचारी घरोघरी जाऊन भेटी देतात. ज्यांच्यामध्ये काही संशयास्पद लक्षणे दिसून येतात त्यांना सरळ रुग्णालयात भरती केले जाते.

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सरकारकडून सातत्याने नवीन सूचना, माहिती लोकांपर्यंत पोचविली जाते. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या कोरोना रुग्णांची माहिती जसे की होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या, रुग्णालयात विलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या दररोज अद्ययावत करून जाहीर केली जाते.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळणारे केरळ देशातील भारतातील पहिले राज्य असूनही, कोरोनाचा प्रसार रोखण्यात इतर कोणत्याही राज्याला जमले नाहीत ते काम केरळने अत्यंत प्रभावीपणे करून दाखविले आहे.

  • विशेष काळजी..

कोविडमुळे जगभरातील लोकांची भीतीने गाळण उडालेली असताना केरळने योग्य ती काळजी घेत लोकांना शांत, संयमित राहून कोविडवर मात करण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.

सर्वात महत्वाचे म्हणजे नोकरीनिमित्त इतर राज्यातून स्थलांतरित झालेल्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली. त्यांना चांगले अन्न, राहण्यासाठी स्वच्छ जागा आणि योग्य ते आरोग्यविषयक उपचार मिळतील याची काळजी घेण्यात आली. या कर्मचाऱ्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा म्हणून त्यांना 'स्थलांतरीत' न म्हणता 'अतिथी कर्मचारी' म्हणून संबोधले जाते. शासन दरबारी अधिकृत पातळीवर त्यांचा याच पद्धतीने उल्लेख केला जातो.

सरकारी अन्नधान्य वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. यात दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) किंवा दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) असा भेदभाव ठेवला नाही. कुणीही नागरिक उपाशी राहणार नाही या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानाने आणि कुणीही नागरिक कोविडमुळे त्रासला जाणार नाही या आरोग्यमंत्र्यांच्या विधानाने राज्याला मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान प्रत्येक पंचायतीत सामुदायिक स्वयंपाकघरांची उभारणी करण्यात आली. याशिवाय कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मिळणारे निवृत्तीवेतन आगाऊ स्वरूपात वितरित करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्वतयारी म्हणून केरळमधील अनेक सभागृह, हॉटेल, शाळा आणि रिक्त इमारती यांचे रूपांतर कोविड केंद्रात करण्यात आले. कोविडचा प्रसार ज्या ७ जिल्ह्यांमध्ये वेगाने होऊ शकतो त्या जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले. काही निवडक जिल्ह्यांमध्ये विशेष कोविड रुग्णालये उभारण्यात आली. तर त्या रुग्णालयांमधील उर्वरित रुग्णांना इतर शासकीय आरोग्य सुविधांमध्ये हलविण्यात आले.

कासारगड सारख्या सर्वाधिक बाधित जिल्ह्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन व्यतिरिक्त खास सुरक्षा व्यवस्था करून आरोग्य पथक नेमण्यात आले.

  • प्राणांचे संरक्षण..

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाधित सर्वात वयोवृद्ध रुग्ण म्हणून नोंद करण्यात आलेल्या ९३ वर्षीय थॉमस यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. केरळसाठी ही मोठी अभिमानास्पद बाब होती. थॉमस हे पठाणमथिट्टा येथील राणीचे रहिवासी आहेत.

ज्यावेळी यूरोपसारखे देश कोरोनाबाधित वयोवृद्धांवर उपचार करण्यास घाबरत होते त्यावेळी थॉमस आणि त्यांची ८८ वर्षांची पत्नी मरिअम्मा यांना सुखरूप घरी सोडण्यात आले.

मृत्यू हा अटळ असून तो माणसाच्या हातात नाही हे जरी खरे असले तरी प्रत्येक रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभाग आणि केरळ सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

पर्यटनासाठी आलेल्या आणि कोरोनाने प्रभावित सात परदेशी पर्यटकांवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले. परिणामी ते कोरोनामुक्त होऊन आपल्या मायदेशी परतले. रूग्णांवर उपचारांदरम्यान कोविडचा संसर्ग झालेली नर्स रेश्मा देखील कोरोनातून सहीसलामत बरी होऊन डिस्चार्जही मिळाला. केरळसाठी हा एक मोठा दिलासा देणारा आणि अभिमानाचा क्षण होता. प्रतिबंध हीच सर्वोत्तम संरक्षण रणनीती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केरळने निपाह विषाणूला यशस्वीरीत्या हद्दपार केले. आता कोविड १९शी देखील यशस्वी मुकाबला सुरु असून या लढाईत देखील नक्कीच विजय मिळेल असा विश्वास आहे.

हेही वाचा :इबोलाचे औषध रोखू शकते कोरोनाचा प्रसार; वैद्यकीय संशोधन परिषदेने व्यक्त केली शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details