नवी दिल्ली - चंद्रावर ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणीही पोहोचले नाही, त्या ठिकाणी चांद्रयान-२ उतरणार आहे. आजपर्यंतचे सर्व टप्पे चांद्रयान-२ ने यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामुळे आजचा शेवटचा सॉफ्ट लँडिंगचा टप्पादेखील नक्कीच यशस्वीरित्या पार पाडू, असा विश्वास इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज व्यक्त केला. आम्ही सर्वांनी आमचे काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने केले आहे. आता आम्ही आज रात्री होणाऱ्या लँडिंगची आतुरतेने वाट पाहत आहोत. हा एक मोठा अविस्मरणीय क्षण असेल. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज इस्रोमध्ये उपस्थित असणार आहेत, असे ते म्हणाले.
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ काही तासांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या यशस्वी लँडिंगनंतर रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनंतर चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे ६०-७० विद्यार्थी बंगळुरुमधील इस्रो सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :'चांद्रयान-२'च्या लँडिंगलसाठी मोदी उत्सुक; क्षणाक्षणाला घेत आहेत माहिती