नवी दिल्ली -जर सर्व व्यवस्थित राहिलं तर, भारतात लवकरच कोरोनाच्या प्लाझ्मा थेरपीला सुरुवात होऊ शकते. या थेरपीच्या वैद्यकीय चाचणीला लवकरच सुरुवात होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे संपूर्ण देश हा कोरोना संसर्गावर औषधं शोधण्याच्या धडपडीत लागला असताना भारतात प्लाझ्मा थेरपीच्या उपचारातून रुग्ण बरे होण्याबाबत आशा बळकट होत आहे. यासाठी भारताची सर्वोच्च वैद्यकीय संस्था, आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)च्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.
“डीसीजीआयने वैद्यकीय चाचणीला मान्यता दिल्यानंतर आम्ही त्यासाठीच्या परिक्षणाची सुरुवात करू. मात्र, त्यासाठी काही काळ लागू शकतो,” असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. मनोज मुरहेकर यांनी शनिवारी 'ईटीव्ही भारत'शी झालेल्या विशेष मुलाखतीत बोलताना सांगितले. या चाचणीकरता लागणारे रक्त, लस, कोरोनाच्या रुग्णाला इंजेक्शन देणे आणि सेरासारख्या काही विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या मान्यतेचा अधिकार डीसीजीआयकडे आहे. त्यामुळे त्यांची मंजूरी मिळण्याची वाट बघत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ?
प्लाझ्मा थेरपी उपचारात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांच्या शरिरात त्या विषाणूशी लढताना तयार झालेल्या अँटीबॉडीज वापरून संक्रमित रुग्णांवर उपचार करणे होय.
या उपचारात कोरोनासारख्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीचे रक्त काढून त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा वेगळा केला जाऊन त्याला संक्रमित रुग्णाच्या शरीरात टाकले जाईल. या प्रकारे बरे झालेल्या रुग्णाच्या शरिारात प्रतिकार करून ज्या पद्धतीने या प्लाझ्माने त्या व्यक्तीला बरे केले. तसेच इतर रुग्णांच्या शरिरात हा प्लाझ्मा वापरुन संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.
मात्र, याकरता कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची २-३ आठवड्यानंतर तपासणी करून त्यांचा रिपोर्ट दोनदा निगेटिव्ह आल्यानंतरच त्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा हा इतर रुग्णांवर उपचाराकरता वापरता येईल. मात्र, याकरता आम्हाला कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या आणि त्यांचा २-३ आठवड्यानंतरचा निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींची मदत हवी असल्याचे मुरहेकर म्हणाले.
विशेष म्हणजे, प्लाझ्मा थेरपीवरील चाचणी ही काही देशांमध्ये यशस्वी ठरली आहे. तसेच अमेरिकेमध्येही 'अमेरिकन फूड अॅण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन'ने याला मान्यता दिली असल्याचेही डॉ मुरहेकर यांनी यावेळी नमूद केले.