वायनाड - माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा वायनाडचा दौरा केला आहे. राहुल गांधींनी मंगळवारी वायनाडमधील पुरग्रस्त नागरिकांची भेट घेतली. 'मी केरळचा मुख्यमंत्री नाही. आमचे राज्यात किंवा केंद्र सरकारमध्ये सरकार नाही. मात्र, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणे माझे कर्तव्य आहे', असे पुरग्रस्त लोकांना संबोधीत करताना राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी वायनाडमध्ये चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी वायनाडमधील चुनगाम आणि वलाडमधील बाधीत लोकांना काही आवश्यक वस्तूचे वितरण केले. 'ही एक मोठी दु:खद घटना आहे. मात्र वायनाडमधील लोक मोठ्या हिमतीने याचा सामना करत आहेत. पुरामुळे लोकांनी त्यांची शेती, पीक, आणि घरे गमावली आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. केंद्र सरकार पक्षपात करत आहे. जेथे त्यांचे सरकार नाही. तिथल्या लोकांची त्यांना काळजी नाही, असे राहुल गांधी म्हणाले.